esakal | चर्चेची आजची पाचवी बैठक होणार 'आर या पार'; शेतकऱ्यांनी व्यक्त केला निर्धार
sakal

बोलून बातमी शोधा

farmers protest

आजच्या बैठकीत काही ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. 

चर्चेची आजची पाचवी बैठक होणार 'आर या पार'; शेतकऱ्यांनी व्यक्त केला निर्धार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांनी देशात रान उठवलं आहे. हे तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असून या कायद्यांना जोरदार विरोध शेतकरी संघटनांकडून नोंदवला जातोय. पंजाब आणि हरियाणा भागातले शेतकरी मोठ्या प्रमाणावर जमले असून दिल्लीच्या सीमेवर त्यांनी चक्का जाम केला आहे. ऐन थंडीतील या आंदोलनाचा आज दहावा दिवस असला तरीही शेतकऱ्यांचा निर्धार जराही ढासळला नाहीये. आज चर्चेची पाचवी बैठक आहे, या बैठकीत काही ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांना अमान्य असणारे तीन कृषी कायदे सरकारे आवाजी मतदानाने पारित केले होते. या कायद्यांना विरोधी पक्षांचा तर विरोध आहेच सोबतच एनडीएतील घटक पक्षांनीही या मुद्यांवरुन एनडीएची साथ सोडली आहे. शेतकऱ्यांनी या कायद्याच्या विरोधात कंबर कसत मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीनेच दिल्लीकडे कूच केली आहे. चर्चेच्या चार फेऱ्या दिल्लीतील विज्ञान भवनात झाल्या आहेत. मात्र अद्याप एकाही बैठकीला यश आलं नाहीये. आज चर्चेची पाचवी बैठक होणार आहे.

हेही वाचा - शेतकरी आंदोलनात जोश-उत्साह-प्रोत्साहनासाठी डीजे ट्रॅक्टर

आज आर-पारची लढाई करुन येऊ. रोज रोज बैठक होणार नाही. आजच्या बैठकीत अन्य कोणतीही चर्चा होणार नाही. कायदा रद्द करण्याबाबतच चर्चा होईल, असं किसान संयुक्त मोर्चाचे प्रमुख रामपाल सिंह यांनी म्हटलं आहे. सरकारने कृषीविषयक ते तीन काळे कायदे रद्द करण्याची घोषणा करावी. तसेच MSP चालू राहिल हे लिखित स्वरुपात द्यावे. जर आजच्या बैठकीत काहीच सकारात्मक घडलं नाही तर राजस्थानातील शेतकरी NH-8 हायवेवर तसेच जंतरमंतर मैदानात तीव्र आंदोलन करतील असा इशारा किसान महापंचायतचे अध्यक्ष रामपाल जट यांनी दिला आहे.

सरकार वारंवार तारीख देत आहे. सर्वच संघटनांना आता एकमताने हा निर्णय घेतलाय की आज चर्चेचा हा शेवटचा दिवस असेल. जर आजच्या बैठकीत काही ठोस असा निर्णय झाला नाही तर संसदेला घेराव घालू असा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे. 
आज सरकारच्या प्रतिनिधींसोबतची बैठक सकारात्मक ठरेल अशी आशा आहे. आमच्या मागण्या जोवर पूर्ण होत नाहीत तोवर आम्ही मागे हटणार नाही. आम्ही याहून अधिक जोरदार आंदोलन करु, असं एका शेतकऱ्याने म्हटलं.

loading image