
याआधी या आंदोलनात शेतकऱ्यांना उत्साहित करण्यासाठी 'डिजे ट्रॅक्टर' आणला गेला होता.
नवी दिल्ली : गेल्या 24 दिवसांपासून हरियाणा-दिल्लीच्या शिंघू बॉर्डरवर शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही हे शेतकरी आपल्या निश्चयापासून अजिबातच ढळलेले नाहीयेत. वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन सातत्याने चर्चेत येत आहे. याआधी या आंदोलनात डिजे ट्रॅक्टर आणला गेला होता. आंदोलक शेतकऱ्यांना उत्साहित करण्यासाठी म्हणून याचा वापर केला जात आहे. याचप्रकारे आता पंजाबमधील काही आंदोलकांनी शिंघू बॉर्डरवर टॅटू काढून देणारा एक स्टॉल लावला आहे. आंदोलनस्थळी असलेल्या आंदोलकांना मोफतमध्ये टॅटू काढून देण्याचं काम याठिकाणी होत आहे. या स्टॉलमधील एक आर्टिस्ट रविंद्र सिंह यांनी म्हटलं की, यामागील कल्पना अशी आहे की, आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे तसेच या आंदोलनाची आठवण म्हणून हे टॅटू काढण्यात येत आहेत.
हेही वाचा - झाले गेले विसरा पक्षासाठी एकत्र या; सोनियांनी घातली भावनिक साद
त्यांनी पुढे म्हटलं की, मी लुधियानातून आलो आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी टॅटू काढत आहोत. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश आहे. या टॅटूंमध्ये सिंह, ट्रॅक्टर्स, पिके, शेतकरी, पंजाबचा नकाशा आणि मोटीव्हेशनल कोट्स इ. गोष्टी आम्ही काढून देत आहोत. हा टॅटू त्यांना या शेतकरी आंदोलनाची कायमस्वरुपी आठवण करुन देत राहिल. आतापर्यंत आम्ही 30 टॅटू काढले असल्याचं त्यांनी म्हटलं.
जेंव्हा तरुण सहभागी होतात तेंव्हाच काहीतरी शक्य होतं. या माध्यमातून आम्ही तरुणांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करत आहोत. आम्ही याबाबत सोशल मीडियातूनही लोकांना सांगत आहोत.
हेही वाचा - "शांततेने तोडगा काढण्यावर भर, पण देशहिताशी तडजोड नाही"
या टॅटंमध्ये पंजाबचा नकाशा, सिंहाचा चेहरा, शेतकरी, ट्रॅक्टर तसेच अनेक मोटीव्हेशनल कोट्स आहेत. 'कर हर मैदान फतेह, निश्चय कर अपनी जीत करो', असे अनेक कोट्स आहेत. या टॅटूंची खरी किंमत 3,500 ते 5000 रुपयांपर्यंत आहे. टॅटू काढणारे हे आर्टिस्ट शुक्रवारी सकाळी दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर शाई, टॅटू मशिन्स, सुई अशा आपल्या साहित्यासह पोहोचले आहेत.