"शांततेने तोडगा काढण्यावर भर, पण देशहिताशी तडजोड नाही"

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 19 December 2020

कोणत्याही वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे, मात्र देशहिताच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि कोणतेही नुकसान सहन करणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिला.

हैदराबाद- कोणत्याही वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे, मात्र देशहिताच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि कोणतेही नुकसान सहन करणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिला. हैदराबाद येथील डिंडीगुळ येथे हवाई दलाच्या संयुक्त पदवी प्रदान सोहळ्यानमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोविडच्या काळात चीनने आपले मनसुबे जगाला दाखवून दिले, असेही ते म्हणाले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, की चीनबरोबरचा सीमा वाद भारताने समर्थपणे हाताळला आणि यातून भारत कमकुवत नाही, हे सर्वांना कळून चुकले. सीमेवरील कारवाया, घुसखोरी किंवा एकतर्फी कारवाईला भारत चोखपणे उत्तर देऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. भारताच्या भूमिकेचे अनेक देशांनी स्वागत आणि कौतुक केले आहे. 
पाकिस्ताबाबत बोलताना राजनाथसिंह म्हणाले, की आतापर्यंत पाकिस्तान चार युद्धात पराभूत झाला आहे. तरीही दहशतवादाच्या आड पाकिस्तान भारताशी छुपे युद्ध लढत आहे. आपल्याला शांतता हवी, संघर्ष नको. परंतु देशहित आणि आत्मसन्मानासाठी कोणतिही तडजोड करणार नाही. कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज असल्याचेही ते म्हणाले. 

निवडणुकीपर्यंत तृणमूलमध्ये एकट्या ममतादिदी राहतील; अमित शहांची बोचरी टीका

पाकिस्तानकडून सीमेवर छुपे युद्ध खेळले जात आहे. परंतु भारतीय लष्कर आणि पोलिस हे दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यास सक्षम असल्याचेही ते म्हणाले. बालाकोटच्या कारवाईचा उल्लेख करत राजनाथसिंह म्हणाले, की, भारत केवळ देशातच नाही तर सीमेबाहेर जावूनही दहशतवाद मोडून काढत आहे. अशा प्रकारच्या कारवाईतून भारताची लष्कर शक्ती आणि दहशतवाविरोधात लढण्याची ताकद जगाला पाहवयास मिळत आहे, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: defence minister rajnath singh warn pakistan china