ट्रॅक्टर परेडमध्ये काठी आणा सांगणारा व्हिडीओ व्हायरल; शेतकरी नेत्यानं दिलं स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

काल 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली.

चंदीगढ : काल 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली. या ट्रॅक्टर परेडमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्षांचं वातावरण पहायला मिळालं. या साऱ्या घडामोडींनंतर आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ते लाठी-काठी सोबत ठेवण्याविषयी बोलताना दिसत आहेत. यासोबतच ते म्हणत आहेत की, सरकारकडून त्यांची जमीन हिसकावून घेतली जाईल.  

काही शेतकरी नेते या आंदोलनात झालेल्या हिंसेबाबत दु:ख व्यक्त करत आहेत तर काही या हिंसेबाबत आपण जबाबदार नसल्याचं सांगत आहेत. हिंसक झालेले लोक शेतकरी नसून बाहेरचे घुसखोर होते, असा दावा काहींनी केला आहे.  

प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या या संघर्षाबाबतचं स्पष्टीकरण देताना राकेश टिकैत यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलंय की, हो, मी लोकांना लाठी-काठी आणायाला सांगितलं होतं. कृपया मला कुणी असा झेंडा दाखवा जो विनाकाठीचा असेल. तर मी माझी चूक कबूल करेन. याआधी राकेश टिकैत यांनी म्हटलं की, लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शीख नाहीये तर तो भाजपाचा कार्यकर्ता आहे. तसेच या दीप सिद्धूचा पंतप्रधान मोदींसोबत फोटो देखील आहे. 

हेही वाचा - Farmer Protest: दिल्ली हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून शेतकऱ्यांविरोधात 22 FIR
पुढे त्यांनी म्हटलं की, हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे आणि ते त्यांचेच राहिल. ज्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आहेत, ते शेतकरी आंदोलनाचा भाग नाहीयेत. राकेश टिकैत यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावर निघालेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी बांधवांचे आभार मानले आहेत. तसेच परेडदरम्यान झालेल्या अप्रिय घटनांची कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers Protest tractor parade Rakesh Tikait BKU We said bring your own sticks