
प्रजासत्ताक दिनाला तिरंग्याच्या झालेल्या अपमानामुळे देश दुखी झाला, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या मन कि बातमध्ये मांडलं. मोदींनी या व्यतिरिक्त या विषयावर सविस्तरपणे काहीही मत मांडलं नाही.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला तिरंग्याच्या झालेल्या अपमानामुळे देश दुखी झाला, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या मन कि बातमध्ये मांडलं. मोदींनी या व्यतिरिक्त या विषयावर सविस्तरपणे काहीही मत मांडलं नाही. त्यांच्या या वक्तव्यावर शेतकरी नेता नरेश टिकैत यांनी म्हटलं की, 26 जानेवारी रोजी जे काही झालं तो एका कटाचा भाग होता. याचा व्यापक पातळीवर तपास व्हायला हवा. तिरंगा आमच्यासाठी आदराचं स्थान आहे. आम्ही कधीच तिरंग्याचा अपमान होऊ देणार नाही. सदैव त्याला उंच ठेवू.
गाझीपूरला छावनीचं स्वरुप
सध्या गाझीपूर बॉर्डरला एखाद्या छावनीचं स्वरुप आलं आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्ते आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुरक्षारक्षक मोठ्या संख्येने तैनात आहेत. गाझीपूर बॉर्डरवर अनेक थरांचे बॅरिकेडींग केलं गेलं आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर फौजफाटा देखील तैनात आहे.
हेही वाचा - ओवैसींनी काँग्रेसला म्हटलं 'बँड बाजा पार्टी'; 'भाजपची B टीम' या आरोपावर दिलं प्रत्युत्तर
कडाक्याची थंडी पण निर्धार पक्का
नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन 28 जानेवारी नंतर आणखीनच तीव्र झाले आहे. आज रविवारी या आंदोलनाचा 65 वा दिवस आहे. आज किमान तापमान 3.1 डिग्री असतानाही शेतकरी ठाम निर्धारासह आंदोलनस्थळी टिकून आहेत. सध्या दिल्ली आणि उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या गाझीपूर बॉर्डरवर शांतता आहे. आंदोलनकर्ते शेतकरी, बॅरिकेड्स आणि सुरक्षा रक्षकांशिवाय बाकी काहीच दिसत नाहीये.
दोन फेब्रुवारीला पुढची बैठक
दिल्ली-हरियाणा दरम्यान सिंघु बॉर्डरवर देखील सुरक्षा रक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केलं गेलं आहे. तिथे स्थानिक लोक जागा रिकामी करण्यासाठी आंदोलन करत असल्याचं चित्र आहे. यामुळे पोलिस मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. यादरम्यान पुढची बैठक दोन फेब्रुवारी रोजी होईल, अशी शक्यता आहे.
गांधी पुण्यतिथी निमित्त सद्भावना उपवास
काल शनिवारी महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त शेतकऱ्यांनी 'सद्भभावना दिवस' म्हणून उपवास ठेवला. त्यांनी दिल्ली-मेरठ राजमार्गावर गाझीपूर सहित दिल्लीच्या सीमेवर असणाऱ्या वेगवेगळ्या आंदोलन स्थळी एक दिवसाचा उपवास ठेवला.
शेतकरी मोठ्या संख्येने दाखल
प्रजासत्ताक दिनी झालेल्या गोंधळानंतर परिस्थिती चिघळली होती. रात्री पोलिसांनी आंदोलन स्थळ रिकामं करण्याची नोटीस दिली होती. मात्र, उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील शेतकऱ्यांची महापंचायत मोठ्या प्रमाणावर दाखल झाली. तसेच हरियाणा आणि राजस्थानच्या सीमेवरील शेतकरी देखील तिथे मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी देखील असा दावा केलाय की, गेलेले शेतकरी पंजाब आणि हरियाणामधून सिंघू तसेच टीकरी बॉर्डरवर परतत आहेत. हरियाणा आणि पंजाबमधल्या खाप पंचायतींनी फर्मान काढलं आहे की प्रत्येक घरातून एक तरी आंदोलन स्थळी जायलाच हवा. न गेल्यास 1500 रुपयांचा दंड केला जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे.