बिगर- काश्मिरी लोक मतदार म्हणून अमान्य; फारुख अब्दुल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farooq Abdullah statement Non-Kashmiri people are ineligible voters jammu kashmir

बिगर- काश्मिरी लोक मतदार म्हणून अमान्य; फारुख अब्दुल्ला

श्रीनगर : ‘जम्मू- काश्मीरच्या मतदार याद्यांमधील बिगर काश्मिरींचा समावेश आम्हाला मान्य नाही कारण त्यामुळे या राज्याची वेगळी ओळख संपुष्टात येईल,’ असे ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी अब्दुल्ला यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या निर्णयाला सगळ्या आघाड्यांवर आव्हान देण्याचा आमचा विचार असून त्यात प्रामुख्याने कायदेशीर पैलूंचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी गुपकार आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विकार रसूल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मोहंमद तारिगामी आणि शिवसेनेचे नेते देखील उपस्थित होते.

सज्जाद लोन यांचे पीपल्स कॉन्फरन्स आणि अल्ताफ बुखारी यांच्या अपनी पार्टीने मात्र या बैठकीला दांडी मारली होती. विशेष म्हणजे भाजपने देखील आजच बैठकीचे आयोजन केले असून त्यात पुढील वाटचालीची रणनीती आखण्यात येईल. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अब्दुल्ला म्हणाले की, ‘‘ केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरची ओळख संपुष्टात येईल. राज्याचे विधिमंडळ हे बाहेरच्या व्यक्तीच्या ताब्यात जाणार असून येथील जनता मात्र त्याचा कधीही स्वीकार करणार नाही, आम्ही या निर्णयावर सगळ्या बाजूंनी विचार केला असून शेवटी त्याला विरोध करण्याबाबत आमच्यात मतैक्य झाले आहे. आज जी मंडळी बैठकीला उपस्थित होती त्या सगळ्यांनीच याला विरोध करायचे ठरविले आहे.’’

लोन यांचा आंदोलनाचा इशारा

बिगर काश्मिरी नागरिकांचा जम्मू-काश्मीरच्या मतदार याद्यांमध्ये समावेश केल्यास सर्व सरकारी कार्यालयांसमोर पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल तसेच आम्ही उपोषणाला बसू, असा धमकीवजा इशारा ‘पीपल्स कॉन्फरन्स’चे नेते सज्जाद लोन यांनी सोमवारी केंद्र सरकारला दिला आहे. ‘आम्ही एक ऑक्टोबरपर्यंत वाट पाहू त्यांनतर जर सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही आणि मतदारसंख्येच्या प्रमाणात बदल केला तर आम्ही रस्त्यावर उतरू’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या निर्णयामुळे राज्याची ओळखच धोक्यात येईल. डोग्रा, काश्मिरी, पाहारी, गुज्जर आणि शीख यांची ओळखच त्यामुळे धोक्यात येईल. राज्याचे विधिमंडळ बाहेरच्या लोकांच्या हातामध्ये जाईल त्यामुळेच आम्ही या निर्णयाला विरोध करत आहोत.

- फारुख अब्दुल्ला, अध्यक्ष ‘नॅशनल कॉन्फरन्स’

Web Title: Farooq Abdullah Statement Non Kashmiri People Are Ineligible Voters Jammu Kashmir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..