Fatehbad District Court on Rape | परस्पर सहमतीने संबंध प्रस्थापित करणं दुष्कर्म नाही, बलात्काराचा आरोपी दोषमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court

परस्पर सहमतीने संबंध प्रस्थापित करणं दुष्कर्म नाही, बलात्काराचा आरोपी दोषमुक्त

फतेहबाद अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बलात्काराच्या एका खटल्याची सुनावणी करताना आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश बलवंत सिंग यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिलाय. परस्पर सहमतीने संबंध हा बलात्कार ठरू शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. पीडित तरुणी अनेक महिन्यांपासून आरोपीच्या कॅन्टीनमध्ये काम करत होती. आरोपी विवाहित असतानाही त्याने लग्नाचे बहाणे दिल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं होतं.

पीडितेने आरोपीचा दोष असल्याचं म्हणत तो विवाहित असून लग्नाचं आमिष दाखवल्याचा दावा केला. कोर्टाने या प्रकरणात महिलेला प्रतिप्रश्न केला. आरोपी विवाहित आहे की नाही, याची पूर्वकल्पना असतानाही महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी होकार दर्शवला. न्यायालयाने म्हटलं की, पीडितेच्या वागण्यावरून असं दिसून येतंय की, तिचे आरोपीसोबत असणारे शारीरिक संबंध परस्पर सहमतीने होते. नंतर गुन्हा नोंदवण्यासाठी तिने ही कथा रचली!

सर्वात महत्वाचं म्हणजे १५ जून २०१९ रोजी टोहाना पोलिसांनी गिलानवली धानी येथील रहिवासी असलेल्या दलीपविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून कलम ३१३, ३२८, ३७६, ५०६ आणि आयपीसीच्या एससी एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नोकरीचा शोध... भाड्याची खोली, ज्यूसचा बहाणा आणि शारीरिक संबंध

नोकरीच्या शोधात ती एका शाळेत गेली. याच वेळी तिची शाळेच्या कॅन्टीनचा ठेकेदार असणाऱ्या दलीपशी भेट झाली. दलीपने तिला टोहाना शहरात भाड्याने खोली मिळवून दिली. एक दिवस दोघांचंही भेटण्याचं ठरलं. त्याने ज्यूस आणला आणि तो प्यायल्यानंतर पीडिता बेशुद्ध झाली. यानंतर दलीपने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अनेक महिने तो तिच्यावर बलात्कार करत राहिला. ती गरोदर राहिल्यानंतर गर्भपात झाला. काही काळाने तिने लग्नासाठी विचारणा केली. मात्र, दलीपने आपण विवाहित असल्याचं सांगितलं.

फ्रिजचे थकलेले हप्ते.. आरोपीच्या पत्नीचा जबाब आणि निर्दोष मुक्तता

कोर्टात महिलेच्या आरोपांना उत्तर देताना आरोपीची पत्नीही हजर झाली आणि तिने पीडितेला फ्रिज हप्त्यांवर दिल्याचे आणि हप्तेही स्वतःच भरल्याचे सांगितले. दलीप विवाहित असल्याचे पीडितेला चांगलेच माहिती होते. ही महिला भाड्याने राहत असलेल्या घराच्या मालकानेही न्यायालयात साक्ष दिली. एकदा दलीप खोलीत आला होता. मात्र, यानंतर त्याने दलीपला पुन्हा तिथे पाहिलं नाही.

कपड्यांवरील वीर्य आणि न्यायालयाचं स्पष्टीकरण

न्यायालयाने या खटल्यात महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. जेव्हा हे सिद्ध होतं की पीडितेचे आरोपीसोबत संमतीने संबंध होते. तेव्हा वैद्यकीय पुरावे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. पीडितेच्या अंतर्वस्त्रावर आरोपीचं वीर्य सापडलं असलं तरी बलात्कार झाल्याचे सिद्ध होत नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहं. यानंतर न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

Web Title: Fatehbad District Court Acquitted Rape Accused

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :District court