फीचर फोनधारकांसाठी रिझर्व्ह बँकेकडून ‘यूपीआय १२३ पे’ सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPI

फीचर फोनधारकांसाठी रिझर्व्ह बँकेकडून ‘यूपीआय १२३ पे’ सेवा

मुंबई : देशातील ४० कोटी फीचर फोनधारकांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ‘यूपीआय १२३ पे’ ही सेवा सुरू केली. या सेवेद्‍वारे डिजिटल व्यवहार करण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोनची आवश्‍यकता भासणार नाही. सुमारे सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली यूपीआय (युनिफाईड पेमेंट्‍स इंटरफेस) सेवा फीचर फोनवर मिळणार असल्याने देशातील यूपीआय वापरकर्त्यांमध्ये वाढ होत डिजिटल व्यवहार वाढण्यास मदत होईल, असा आरबीआयला विश्‍वास आहे.

आतापर्यंत ‘यूपीआय’च्या विशेष सेवा स्मार्टफोनवर उपलब्ध होत्या. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत ही लोकप्रिय सेवा पोहोचण्यास विलंब होत होता. गेल्या काही वर्षात स्मार्टफोनच्या किमती कमी झाल्या आहेत, मात्र सामान्य लोकांपर्यंत ही सेवा पोहोचली नव्हती. ‘यूपीआय’च्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात ४१ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात वेगाने वाढ होत ७६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यातच ४५३ कोटी व्यवहारांतून ८.२६ लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली. लवकरच ‘यूपीआय’च्या माध्यमातून १०० लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतील, असा विश्‍वास दास यांनी व्यक्त केला.

चोवीस तास मदत केंद्र

देशातील डिजिटल व्यवहारांची वाढती संख्या पाहता, नागरिकांना २४ तास मदत मिळण्यासाठी एनपीसीआयने ‘डिजिसाथी’ सेवा तयार केली आहे. ही सेवा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सुरू केली. १४४३१ आणि १८००८९१३३३३ या संपर्क क्रमांकांवर डिजिटल व्यवहारासंदर्भात प्रश्‍नांचे निराकरण करण्यात येईल. ‘डिजिसाथी डॉट इन्फो’ नावाने संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे.

चार प्रकाराने व्यवहार

फीचर फोन वापरकर्ते या सेवेचा चार प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने देवाणघेवाणीचे व्यवहार करू शकतात. यामध्ये संवादात्मक आवाज प्रतिसाद (आयव्हीआर नंबर), फीचर फोनसाठी अॅप, मिस्ड कॉल आणि नजीकचा आवाज आधारित व्यवहार या आधारे पैसे पाठवता येतील.

‘यूपीआय’चा विदेशात विस्तार

देशातील यूपीआयला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवरही विस्तार करण्यात यावा, भारतीय तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल व्यवहाराची सेवा अनेक देशांमध्ये पोहोचण्यासाठी नॅशनल पेमेंट्‍स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) प्रयत्न करावेत, असे शक्तिकांत दास यांनी आवाहन केले.

Web Title: Feature Phone Upi 123 Pay Service Start By Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PaymentUPI
go to top