esakal | बंगालमध्ये आज अखेरच्या आठव्या टप्प्याचे मतदान

बोलून बातमी शोधा

anubrata mondal
पश्चिम बंगालमध्ये आज अखेरच्या आठव्या टप्प्याचे मतदान
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोलकता - पश्चिम बंगालच्या बहुचर्चित विधानसभा निवडणूकीसाठी अखेरच्या आठव्या टप्प्याचे मतदान गुरुवारी होईल. ३५ मतदारसंघांमधील २८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सील होईल. कोरोनाच्या भीषण तीव्रतेच्या दुसऱ्या लाटेच्या छायेत ८४ लाखाहून जास्त मतदार आपला हक्क बजावण्याची अपेक्षा आहे.

आधीच्या टप्प्यांतील हिंसाचार आणि प्रामुख्याने चौथ्या टप्प्यात दहा एप्रिल रोजी पाच व्यक्ती केंद्रीय दलाच्या जवानांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यामुळे सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात आली आहे. मतदान मुक्त आणि न्याय्य वातावरणात व्हावे म्हणून केंद्रीय दलांच्या ६४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून यातील २२४ तुकड्या बीरभूम जिल्ह्यात आहेत.

मुर्शिदाबाद आणि बीरभूम जिल्ह्यांतील प्रत्येकी ११, माल्डा जिल्ह्यातील सहा आणि कोलकता जिल्ह्यातील सात मतदारसंघांमधील ११ हजार ८६० मतदान केंद्रांवर मतदान होईल. उत्तर कोलकत्यात शशी पंजा आणि साधना पांडे हे तृणमूलचे मंत्री रिंगणात आहेत. पंजा यांनी श्यामपुकूर, तर साधना यांनी माणिकतला मतदारसंघातून लढत आहेत.

हेही वाचा: जबाबदार नागरिकत्व: काळाची गरज

अनेक ठिकाणी तृणमूल विरुद्ध भाजप मुकाबला असला तरी माल्दा आणि मुर्शिदाबाद येथे तिरंगी लढत अपेक्षित आहे. कारण येथे डावे आणि काँग्रेस आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूक आयोगाने अनेक निर्बंध घातल्यामुळे या टप्प्यात प्रचाराचा धुरळा उडाला नाही. प्रचारफेऱ्या, वाहनफेऱ्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे विविध पक्षांना व्हर्च्युअल सभा किंवा छोट्या कोपरा सभांचे आयोजन करावे लागले.

बीरभूमच्या नेत्यावर करडी नजर

तृणमूल काँग्रेसचे बीरभूम जिल्ह्याध्यक्ष अनुब्रत मोंडल यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी सात वाजेपर्यंत सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांच्याविरुद्ध असंख्य तक्रारी आल्या आहेत. याआधी २०१६ मधील विधानसभा निवडणूक तसेच २०१९ मधील लोकसभा निवडणूकीच्यावेळीही त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात आली होती.