मोठी बातमी! देशातील आर्थिक व्यवहारांवर लॉकडाऊनचा 'असा' झाला परिणाम; जाणून घ्या महत्वाची माहिती..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

कोरोनाच्या फैलावामुळे एप्रिल महिन्यातील टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर देशात विविध माध्यमांमधून होणारे आर्थिक व्यवहार सत्तर टक्क्यांपर्यंत रोडावल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 

मुंबई: कोरोनाच्या फैलावामुळे एप्रिल महिन्यातील टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर देशात विविध माध्यमांमधून होणारे आर्थिक व्यवहार सत्तर टक्क्यांपर्यंत रोडावल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 

मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात धनादेश, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस आदींमार्फत होणारे आर्थिक व्यवहार 26 ते 70 टक्के कमी झाले. या घटलेल्या व्यवहारांचे रुपयांमधील मूल्य पाहिले तर ते 46 टक्के एवढे होते. केवळ आधारच्या माध्यमातून केंद्र सरकारने थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केलेल्या रकमांच्या व्यवहारात मोठी म्हणजे 138 टक्के वाढ झाली आहे. शेतकरी अनुदाने, महिलांची अनुदाने आदींचे हे पैसे होते.  

सर्वात मोठी बातमी - मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट...

धनादेश  आणि आरटीजीएस: 

एरवी धनादेशाद्वारे दरमहा साडेपाच लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतात. मार्चमध्ये 5 लाख 65 हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाले. पण एप्रिलमध्ये धनादेशाद्वारे फक्त 1 लाख 63 हजार कोटींचे व्यवहार झाले. या व्यवहारांमध्ये 71 टक्के घट झाली. मार्चमध्ये आरटीजीएस द्वारे 120 लाख कोटींचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी एप्रिलमध्ये हात आखडता घेतला व त्या महिन्यात फक्त 64 लाख कोटी रुपयांचेच व्यवहार केले. ही घट निम्म्याच्या आसपास म्हणजेच 46.5 टक्के एवढी होती. 

एनईएफटी: 

एनईएफटी व आरटीजीएस ही मोठ्या आणि वेगवान पेमेंटसाठीची लोकप्रीय माध्यमे आहेत. त्यांच्यामार्फत देशातील 90 टक्के पेमेंट व्यवहार होतात, आरटीजीएस चे क्लिअरिंग सतत होते, तर नेफ्ट व्यवहारांचे क्लिअरिंग अर्ध्या तासाने होते. एप्रिलमध्ये एनईएफटीच्या व्यवहारांमध्ये 42.7 टक्के घट झाली. 22 लाख 83 हजार कोटी रुपयांचे व्यवहार मार्च महिन्यात झाले तर एप्रिलमध्ये फक्त 13 लाख कोटींचे व्यवहार झाले. एप्रिलमध्ये लोकांनी फक्त जीवनावश्यक बाबी तसेच वैद्यकीय कारणांसाठीच खर्च केल्याने एटीएम कार्डांद्वारे पैसे काढण्याचे व्यवहार 49 टक्के घसरले. 

एटीएम: 

मार्चमध्ये एटीएम मधून अडीच लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले तर एप्रिल महिन्यात फक्त सव्वा लाख कोटी रुपयेच काढले गेले. 

आयएमपीएस आणि यूपीआय: 

आयएमपीएस मार्फत होणारे व्यवहार 40 टक्के कमी (मार्च मध्ये दोन लाख कोटी तर एप्रिलमध्ये सव्वा लाख कोटी) झाले. युपीआय व्यवहारही 26.8 टक्क्यांनी घटले. दुकाने-मॉल येथील पीओएस मशीनमार्फत होणारे व्यवहार 69.7 टक्क्यांनी कमी झाले. खरेदीदारांनी मार्च महिन्यात साडेसहवीस हजार कोटी रुपयांचे तर एप्रिल महिन्यात जेमतेम आठ हजार कोटी रुपयांचे व्यवहार केले. 

हेही वाचा: ऑनलाइन शिक्षणामुळे यंदा टॅब, सेकंडहॅन्ड मोबाइलला सुगीचे दिवस

आधार: 

आधारच्या माध्यमातून केंद्र सरकारने लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केलेली रक्कम मार्चपेक्षा एप्रिल मध्ये दुपटीपेक्षाही जास्त वाढली. मार्च मध्ये सुमारे आठ हजार कोटींची अनुदाने देणाऱ्या केंद्र सरकारने एप्रिल मध्ये जवळपास एकोणीस हजार कोटींची रक्कम बँक खात्यात जमा केली.  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत सरकारने गरीबांना अनुदान दिले. तर अडीच कोटी महिला जनधन खातेदारांना सरकारने तीन महिन्यांसाठी पाचशे रुपये दरमहा देण्याचे ठरवले. केंद्राच्या पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधील शेकऱ्यांचा पहिला हप्ता एप्रिलमध्येही दोन हजार रुपयांच्या स्वरुपात देण्यात आला.

financial business is reduced in lockdown said RBI 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial business is reduced in lockdown said RBI