esakal | प्रशांत किशोर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

prashant-kishor

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंड पुकारणारे रणनीतिकार प्रशांत किशोर ऊर्फ ‘पी.के.’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

प्रशांत किशोर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंड पुकारणारे रणनीतिकार प्रशांत किशोर ऊर्फ ‘पी.के.’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पाटण्याच्या पाटलीपुत्र पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. प्रशांत किशोर यांनी अभियान ‘बात बिहार की’साठी आपल्या मजकुराची चोरी केल्याचा आरोप मोतिहारी येथील शाश्‍वत गौतम यांनी केला असून, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. ओसामा नावाच्या व्यक्तीचेही एफआयआरमध्ये नाव आहे. ओसामा याने पाटणा विद्यापीठात विद्यार्थी सरचिटणीसपदाची निवडणूक लढविली होती, तर शाश्‍वत हा काँग्रेसचा पूर्वाश्रमीचा कार्यकर्ता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शाश्‍वत गौतम यांनी बिहार की बात नावाचा प्रोजेक्ट तयार केला होता. हा प्रोजेक्ट आगामी काळात ते लाँच करणार होते. यादरम्यान या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या ओसामा नावाच्या युवकाने राजीनामा दिला. याच ओसामाने बिहार की बातचा कंटेट प्रशांत किशोर यांच्या हवाली केला. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी तो संपूर्ण मजकूर आपल्या संकेतस्थळावर अपलोड केला, असे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटणा पोलिस तपासाला लागले आहेत. कलम ४२०, ४०६ नुसार तक्रार दाखल झाली असून, पोलिस अनेक कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. शाश्‍वत गौतम हे बिहारच्या पूर्व चंपारणच्या चैता गावचे रहिवासी आहेत, ते इंजिनिअर असून अनेक दिवस ते अमेरिकेत होते. २०११ मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने शाश्‍वत गौतम यांची ग्लोबल लीडर फेलोसाठी निवड केली, तेथे त्यांनी एमबीए केले होते.

गौतम यांची तीन वर्षांपासून भेट नाही
तक्रारीसंदर्भात प्रशांत किशोर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावरचा आरोप बिनबुडाचा असून शाश्‍वत गौतम यांची दोन- तीन वर्षांपासून भेट नाही. त्यांचा प्रोजेक्ट मी कशाला वापरेन, असा सवाल केला. मी जगाला माझ्या प्रोजेक्टबद्धल सांगतो, दुसऱ्यांचा प्रोजेक्ट घेऊन मी काय करणार, अशी विचारणा त्यांनी माध्यमांस केली आहे.

loading image