कोरोना लशीवर नाही विश्वास; "आधी पंतप्रधान मोदींनी लस टोचून घ्यावी"

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 8 January 2021

कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या दोन लशींना भारत सरकारने मंजुरी दिली आहे

नवी दिल्ली Corona Vaccine- कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या दोन लशींना भारत सरकारने मंजुरी दिली आहे. देशात लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस दिली आहे. लस मिळावी यासाठी सर्वांना आतुरता होती, पण आता लस टप्प्यात आल्यानंतर यावरुन राजकारण सुरु झालं आहे. कोरोना लस प्रभावी आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. अनेकांनी कोरोना लशीवर अविश्वास दाखवला आहे. 

महेश कोठेंच्या प्रवेशापूर्वी शरद पवार आज दुपारी दोन वाजता घेणार बैठक !

राष्ट्रीय जनता दलाचे नेता तेज प्रताप यादव यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. ANI या वृत्त संस्थेशी बोलताना तेज प्रताप यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी कोरोना लस घ्यायला हवी, तेव्हाच लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. आधी पंतप्रधान मोदी यांनी कोविड-19 लस घ्यावी, त्यानंतर आम्ही लस टोचून घेऊ. 

कोरोना लशीसंबंधी समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही वक्तव्य केलं होतं. त्यांनी कोरोना लशीला भाजपची लस ठरवून टाकलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भाजपच्या लशीवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे आम्ही भाजपची लस घेणार नाही. आमचं जेव्हा सरकार येईल, तेव्हा सर्वांना लस मोफत दिली जाईल. असे असले तरी त्यांनी नंतर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत म्हटलं होतं की, त्यांचा हेतू लस निर्माण करणाऱ्या वैज्ञानिकांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा नव्हता. 

दरम्यान, भारतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे देशात लवकरच लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनुसार 13 जानेवारीपासून देशात लसीकरण सुरु होईल. सर्वात आधी देशातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यानंतर देशातील नागरिकांना लस दिली जाईल. सर्वसामान्यांपर्यंत लस पोहोचण्यास जूलै महिना उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first pm modi should take vaccine said rjd leader tej pratap yadav