अर्थमंत्री म्हणतात, महागाई आटोक्यात, उचलली मोठी पाऊले

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

मेगा शॉपिंग फेस्टिव्हल: 
दुबईमध्ये आयोजित केल्याप्रमाणे, भारत मार्च 2020 मध्ये मेगा शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करण्यात येतील. निर्यातीला बळ देण्यासाठी चार मेगा शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: देशातील मंदीसदृश परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा नवीन घोषणा केल्या आहेत. आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पुन्हा एकदा काही घोषणा करणार असल्याचे सांगत सीतारामन यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. निर्यात आणि नवीन घर खरेदी करण्यासंदर्भात आज नवीन घोषणा करण्यात येणार आहेत. 

एप्रिल ते जून तिमाहीत अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे दिसते आहे. देशातील महागाई नियंत्रणात असून औद्योगिक उत्पादन पुनरुज्जीवित होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. गेल्या महिन्यात बँकांचे एकत्रीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. बँकांचा  'क्रेडिट आउटफ्लो' वाढला आहे.  येत्या शुक्रवारी  होणाऱ्या वस्तू आणि सेवाकर समितीच्या बैठकीआधी बँकांच्या प्रमुखांच्या भेटी घेणार असल्याचेही सीतारामन  यांनी सांगितले. 

आता प्राप्तिकरासाठी ई-एससेसमेंट योजना लागू करण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या नोटीस या आता सिस्टिमच्या माध्यमातून दिल्या जातील. दसऱ्यापासून ही योजना लागू करण्यात येईल. यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप नसेल. स्वयंचलित (ऑटोमॅटिक) पद्धतीने प्राप्तिकरासाठी ई-एससेसमेंट केले जाईल. 

निर्यातीला प्रोत्साहन: 
देशाच्या निर्यातीवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यासाठी निर्यात कर देखील कमी केला जाणार असल्याचे सूतोवाच यावेळी करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने निर्यातीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी आता विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी एक कृती योजना आखण्यात येणार आहे. जलद निर्यातीसाठी विमानतळ आणि बंदरावर आंतरराष्ट्रीय मानदंडांनुसार कामकाजाचे नियमन करण्यात येईल.  

मेगा शॉपिंग फेस्टिव्हल: 
दुबईमध्ये आयोजित केल्याप्रमाणे, भारत मार्च 2020 मध्ये मेगा शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करण्यात येतील. निर्यातीला बळ देण्यासाठी चार मेगा शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FM Nirmala Sitharaman press conference on Indian economy