esakal | ‘अंतिम अरदास’साठी राजकारण्यांना व्यासपीठावर मज्जाव
sakal

बोलून बातमी शोधा

‘अंतिम अरदास’साठी राजकारण्यांना  व्यासपीठावर मज्जाव

‘अंतिम अरदास’साठी राजकारण्यांना व्यासपीठावर मज्जाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखीमपूर खेरी : तिकोनिया गावात ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या चार शेतकऱ्यांसाठी मंगळवारी (ता. १२) ‘अंतिम अरदास’ (अंतिम प्रार्थना) होणार असून त्यावेळी व्यासपीठावर कोणताही राजकीय नेता उपस्थित नसेल, असे भारतीय किसान संघटनेच्या वतीने (बीकेयू-टिकैत) आज सांगण्यात आले.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभरात मोठा प्रतिसाद; अनेक ठिकाणी तणाव

भाजपचे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या मोटारीखाली चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, असा दावा आंदोलकांनी केला आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी शीख धर्मानुसार उद्या अंतिम प्रार्थना होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी झाली आहे, असे ‘बीकेयू-टिकैत’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमनदीप सिंग संधू म्हणाले. या प्रार्थनेत राजकीय नेते सहभागी होणार का, असे विचारले असता, ‘व्यासपीठावर केवळ संयुक्त किसान मोर्चाचे नेते असतील. एकाही राजकीय नेत्याला तेथे उपस्थित राहू दिले जाणार नाही,’ असा स्पष्ट इशारा संघटनेचे उपाध्यक्ष बलकार सिंग यांनी दिला. विविध राज्यांमधील आणि उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांमधील शेतकरी संघटनांचे नेते व सदस्य ‘अरदास’ आणि ‘भोग’ (प्रसाद) कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. याशिवाय अन्य कोणताही कार्यक्रमाचे आयोजन केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘शहीद किसान यात्रा’

जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मृत शेतकऱ्यांची राख घेऊन ‘शहीद किसान यात्रा’ काढण्याचा इशाराही शेतकरी संघटनेने दिला आहे. तसेच येत्या १८ रोजी देशभरात सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात येईल. शिवाय लखनौला येत्या २६ रोजी महापंचायतीचे आयोजन करण्याचे आवाहन ‘एसकेएम’ने केले आहे.

loading image
go to top