आपचे माजी आमदार कपिल मिश्रा यांचा भाजपमध्ये प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपचे माजी आमदार कपिल मिश्रा यांचा भाजपमध्ये प्रवेश

राजधानीत जंतरमंतरवरील अण्णा हजारे आंदोलनापासून जोडलेले व आम आदमी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असेलेले माजी आमदार कपिल मिश्रा यांनी अखेर अरविंद केजरीवाल यांची साथ अधिकृतरीत्या सोडली व आज भाजपमध्ये प्रवेश केला.

आपचे माजी आमदार कपिल मिश्रा यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : राजधानीत जंतरमंतरवरील अण्णा हजारे आंदोलनापासून जोडलेले व आम आदमी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असेलेले माजी आमदार कपिल मिश्रा यांनी अखेर अरविंद केजरीवाल यांची साथ अधिकृतरीत्या सोडली व आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होण्याची शक्‍यता पक्षनेतृत्वाला वाटते. 

केजरीवाल यांच्या कथित मनमानी कारभाराविरूध्द कपिल मिश्रा यांनी सुमारे दीड वर्षापासून उघडपणे टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर त्यांना आपमधून बाहेर जावे लागले व काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी त्यांची आमदारकीही रद्द केली. आपचे वर्चस्व असलेल्या दिल्ली विधानसभेत त्यांना धक्काबुक्‍कीही झाली. मिश्रा यांनी दिल्लीची अर्धी ताकद हाती असेलल्या केंद्रातील सत्तारूढ भाजपचा पर्याय निवडला. भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार मनोज तिवारी, दिल्ली प्रभारी श्‍याम जाजू, माजी मंत्री विजय गोयल यांनी मिश्रा यांचे सकाळी स्वागत केले.

तिवारी म्हणाले, की मिश्रा यांच्यासारखा मेहनती कार्यकर्ता दिल्ली भाजपमध्ये आला ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मिश्रा यांनी काल सायंकाळी "दिल्ली चले मोदी के साथ' असे ट्विट करत आपल्या भाजप प्रवेशाचे संकेत स्पष्टपणे दिले होते.

दिल्लीच्या करावल नगर भागातून दोनदा विधानसभेवर निवडून गेलेले कपिल मिश्रा हे आपच्या मोजक्‍या लोकप्रिय चेहऱ्यांपैकी मानले जाते. त्यांच्याआधी नजफगढचे आमदार देवेंद्र सहेरावत व गांधीनगरचे आमदार अनिल वाजपेयी यांनीही नुकतीच केजरीवाल यांची साथ सोडून भाजपचा रस्ता पकडला होता. या तिघांच्याही समर्थकांची संख्या पाहता, आपमधून भाजपमध्ये होणारी ही आवक यापुढेही कायम रहाणार अशी चिन्हे आहेत. 

आज भाजपवासी झाल्यावर मिश्रा यांनी व्यासपीठावरूनच 'खिलते कमल से आशा हैं, बाकि सब तमाशा हैं। असे दुसरे ट्विट केले. आपली आई भाजपची जुनी कायकर्ती असून मीही त्याच पक्षाचा मार्ग निवडावा ही एकच इच्छा तिने बाळगली आहे असे मिश्रा यांनी सांगितले.

ते म्हणाले, की "लोकसभा निवडणुकीत सातही मतदारसंघांत मी भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता व विधानसभा निवडणुकीतही मी तेच करणार. माझ्या जिवाला धोका कायम असला तरी आता मी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपची साथ सोडणार नाही. आगामी निवडणुकीत मी '60 सीटें मोदी को','' ही मोहीम राबविणार आहे. 

जाजू यांनी 'सकाळ' ला सांगितले, की कपिल मिश्रा हे आपचे संस्थापक होते. केजरीवाल यांच्या हुकूमशाही व मनमानीला कंटाळून पक्षत्याग करणारे ते आपचे अखेरचे संस्थापक आहेत. मिश्रा यांच्यासारखे दिल्लीतील अनेक प्रामाणिक कार्यकर्तेही केजरीवाल यांना अतिशय कंटाळले आहेत. त्या सर्वांसमोर नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वाखालील भ्रष्टाचारमुक्त भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असेही जाजू सूचकपणे म्हणाले.