सितारमण अर्थ मंत्री होताच माझ्या बदलीच्या मागे लागल्या; माजी अर्थ सचिवांचा खळबळजनक खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मागील वर्षी जूनमध्ये संसदेत सादर केल्यानंतरच्या महिनाभरातच गर्ग यांची वित्तसचिव पदावरून उचलबांगडी करण्यात येऊन ऊर्जा विभागात बदली करण्यात आली होती. 

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कार्यपद्धती तसेच बॅंकेतर वित्तीय संस्थांचे पॅकज, रिझर्व्ह बॅंकेची भांडवली चौकट, आंशिक वित्तीय हमी योजना यासारख्या मुद्द्यांवरून झालेल्या मतभेदांमुळे आपली अर्थमंत्रालयातून गच्छंती झाली, या माजी अर्थ सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या खळबळजनक खुलाशामुळे विरोधकांना सरकारवर हल्ला चढविण्यासाठी नवे हत्यार दिले आहे.

राजस्थान केडरचे प्रशासकीय अधिकारी राहिलेले सुभाषचंद्र गर्ग हे अर्थ सचिव होते. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मागील वर्षी जूनमध्ये संसदेत सादर केल्यानंतरच्या महिनाभरातच गर्ग यांची वित्तसचिव पदावरून उचलबांगडी करण्यात येऊन ऊर्जा विभागात बदली करण्यात आली होती. मात्र यामुळे नाराज गर्ग यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सरकारी सेवेला रामराम केला होता. ३१ ऑक्टोबर २०१९ ला त्यांची कार्यमुक्ती झाली होती.

सातत्याने वेगवेगळ्या आर्थिक मुद्द्यांवर ब्लॉग लिहून आपली स्पष्ट मते मांडणाऱ्या गर्ग यांनी सरकारी सेवेतील कार्यमुक्तीच्या वर्षपूर्तीनिमित्त, वित्त सचिव पदावरून झालेल्या गच्छंतीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच यामागे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कार्यपद्धती असल्याचा दावाही त्यांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अर्थमंत्रीपद स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी माझ्या बदलीवर भर दिला होता. अन्यथा, आज (३१ ऑक्टोबर २०२०) निवृत्ती झाली असती, असे त्यांनी म्हटले आहे.

हे वाचा - देव मुख्यमंत्री बनले तरी सगळ्यांना सरकारी नोकरी नाही मिळणार - गोव्याचे CM प्रमोद सावंत

आर्थिक धोरणांबाबत निर्मला सीतारामन यांचे आकलन, व्यक्तिमत्त्व आणि सहकाऱ्यांसमवेत काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे कामकाजात अडचण येईल हे लवकरच लक्षात आले होते. आपल्याबद्दल त्यांचे काही पूर्वग्रह होते. त्यामागचे कारण समजू शकले नाही. परंतु, त्यांचा विश्वास नाही आणि सोबत काम करणे शक्य होणार नाही हे स्पष्ट झाले.

कार्यपद्धतीवर परिणाम
रिझर्व बॅंकेची आर्थिक भांडवली चौकट, बॅंकेतर वित्तीय संस्थांच्या पॅकेजचा मुद्दा, आंशिक पतहमी योजना, आयआयएफसीएल सारख्या बॅंकेतर संस्थांचे भांडवलीककरण यासारख्या मुद्द्यांवरून मतभेद वाढले. लवकरच व्यक्तिगत संबंधही बिघडले आणि कार्यपद्धतीवरही त्याचा गंभीर परिणाम झाला, असे गर्ग यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former finance secratary subhash chandra garg says nirmala sitaraman want me out