कर्नाटकच्या 'सिंघम'चा भाजप प्रवेश निश्चित; वयाच्या 26 व्या वर्षी झाला होता IPS

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

सध्या 36 वर्षांचे असलेल्या या माजी आयपीएस अधिकाऱ्याने कर्नाटकमध्ये सेवा बजावली होती. कर्नाटकात ते सिंघम म्हणून लोकप्रिय होते.

नवी दिल्ली - माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई कुप्पुस्वामी यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मंगळवारी दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात पक्षप्रवेश करणार आहे असं त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असलेल्या अन्नामलाई यांनी एक वर्षापूर्वी पोलिस खात्यातून नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अन्नामलाई भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. आज त्यांनी स्वत:हून माहिती दिल्याने सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला. 

सध्या 36 वर्षांचे असलेल्या या माजी आयपीएस अधिकाऱ्याने कर्नाटकमध्ये सेवा बजावली होती. कर्नाटकात ते सिंघम म्हणून लोकप्रिय होते. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जातील असं म्हटलं जात होतं. 

अन्नामलाई यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सांगताना म्हटलं की, स्वतंत्र पक्ष काढण्याचा विचार होता. मात्र गेल्या काही महिन्यात अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. इथूनच माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - 'बिगर-गांधी' काँग्रेस अध्यक्ष निवडायचा झाला तर दोन नावांवर अटकळबाजी

अन्नामलाइ यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ इथे पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर 2011 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी ते आयपीएस झाले. तामिळनाडुतील करूर हे त्यांचे मूळ गाव. त्यांची पहिली नियुक्ती सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून कारकाला उप विभागीय पोलिस स्टेशनला 2013 मध्ये झाली होती. त्यानंतर उडुपी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून 2015 मध्ये कार्यभार सांभाळला होता. अन्नामलाइ यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये बेंगळुरु दक्षिणच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतली होती. वेगवेगळ्या पदांवर त्यांनी जवळपास 8 वर्षे काम केल्यानंतर जून 2019 मध्ये राजीनामा दिला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former IPS officer Annamalai Kuppusamy says he will join BJP today