'बिगर-गांधी' काँग्रेस अध्यक्ष निवडायचा झाला तर दोन नावांवर अटकळबाजी 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 25 August 2020

काँग्रेसचे अध्यक्षपद न स्वीकारण्यावर गांधी कुटुंबीय ठाम राहिल्यास आणि अन्य कुणा ‘बिगर-गांधी’ व्यक्तीकडे पक्षाध्यक्षपद देण्याची स्थिती निर्माण झाल्यास ती व्यक्ती कोण याबाबत अटकळबाजी सुरू झाली आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्षपद न स्वीकारण्यावर गांधी कुटुंबीय ठाम राहिल्यास आणि अन्य कुणा ‘बिगर-गांधी’ व्यक्तीकडे पक्षाध्यक्षपद देण्याची स्थिती निर्माण झाल्यास ती व्यक्ती कोण याबाबत अटकळबाजी सुरू झाली आहे. यामध्ये लोकसभेतील माजी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जाते. राहुल गांधी यांच्या गटाची ‘चलती’ झाल्यास पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचाही नंबर लागू शकतो असेही एका गोटातून सांगण्यात येते. 

वेणुगोपाल यांच्या तुलनेत खर्गे यांचे नाव वजनदार आहे. गेल्या लोकसभेत त्यांनी पाच वर्षे (२०१४-२०१९) कॉँग्रेसचे संसदेत नेतृत्व केले होते आणि संसदेत प्रथमच प्रवेश केल्यानंतरही त्यांनी ही भूमिका अत्यंत प्रभावीपणे पार पाडली होती. खर्गे हे कर्नाटकचे असले तरी हिंदीत बोलू शकतात. त्यामुळे दक्षिणेप्रमाणेच ते उत्तर भारतातही अध्यक्ष म्हणून प्रभाव टाकू शकतील असे मानले जाते. ते दलित समाजाचे आहेत हा कॉँग्रेसच्या उत्तरेतील राजकारणाच्या दृष्टीने आणखी मोठा महत्त्वाचा घटक आहे. कॉँग्रेसच्या गोटातून समजलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी देखील त्यांच्या नावाचा विचार हंगामी अध्यक्ष म्हणून करण्यात आला होता व गांधी कुटुंबाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही केले होते. परंतु अहमद पटेल व मुकुल वासनिक या व अन्य नेत्यांनी त्यात मोडता घातल्याने ते होऊ शकले नाहीत असे समजते. 

सोनिया गांधीच तुर्तास काँग्रेसच्या अध्यक्षपदी; जाणून घ्या १० मुद्दे
 

वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळेच राहुल गांधी यांनी त्यांना महासमिती, पक्षसंघटना यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. सध्या ते सर्वांत ‘पॉवरफुल’ सरचिटणीस म्हणून ओळखले जातात. ते केरळचे आहेत. राहुल गांधी यांना केरळमधून(वायनाड) निवडणूक लढविण्यासाठी ज्यांनी कामगिरी बजावली त्यात ते अग्रभागी होते. वेणुगोपाल हे २००९ ते २०१९ पर्यंत लोकसभेत होते. २०१९ मध्ये त्यांना पक्षाने निवडणूक न लढविण्यास सांगितले आणि त्याची परतफेड म्हणून त्यांना नुकतेच राजस्थानातून राज्यसभेवर घेण्यात आले आहे. वेणुगोपाल हे संघटनेतून वर आलेले व तरुण नेते आहेत. परंतु राजकीय अनुभव व परिपक्वता यात त्यांचे पारडे हलके आहे. तसेच त्यांना हिंदी भाषेचे फारसे ज्ञान नाही ही एक मोठी त्रुटी आहे. 

अर्थात अद्याप यासंदर्भात अनिश्‍चिततेची परिस्थिती आहे. कारण नव्या व पूर्णवेळ अध्यक्षांच्या निवडीसाठी कॉँग्रेस महासमितीच्या अधिवेशनाचे आयोजन केले तरी राहुल गांधी त्यास तयार होतील काय हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावे यासाठी त्यांची मनधरणी सुरू असली तरी त्यांनी अद्याप त्यास अनुकूलता दाखविलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who will be next congress president