माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

pranab mukharjee
pranab mukharjee

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी (वय 84) यांचे आज, अल्पशा आजाराने निधन झाले. प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर प्रकृती खालावली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मुखर्जी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज, त्यांची प्राणज्योत मालवली. 

पहिले बंगाली राष्ट्रपती
काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्याप्रणव मुखर्जी यांनी केंद्रात संरक्षण, परराष्ट्र, अर्थ अशा वेगवेगळ्या खात्यांची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. 2004मध्ये सत्तेत आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (यूपीए) काळात प्रणव मुखर्जी यांनी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. सरकारचे संकटमोचक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जात होता. काँग्रेसने 2012मध्ये त्यांना राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार घोषित केले. प्रतिस्पर्धी उमेदवार पी. ए. संगमा यांचा निवडणुकीत पराभव केल्यानंतर, 25 जुलै 2012 रोजी मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे मुखर्जी हे पहिले बंगाली व्यक्ती होते. 

गावी करायचे दुर्गा पूजा
पश्चिम बंगालमध्ये मिराटी नावाचे गाव हे प्रणव मुखर्जी यांचे मूळ गाव. मुखर्जी वर्षातून एकदा, आपल्या मूळ गावी भेट द्यायचे. बंगालमध्ये दुर्गा पुजेला प्रचंड महत्त्व असते. प्रणव मुखर्जी दर वर्षी दुर्गा पूजा आपल्या गावीच करायचे. 

पुढची पिढीही राजकारणात
प्रणव मुखर्जी यांची पुढची पिढीही सक्रीय राजकारणात आहे. त्यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांनी बंगालमधील जांगीपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. लोकसभेपूर्वी त्यांनी बंगालच्या विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम केले होते. मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा यादेखील काँग्रेसच्या सक्रीय सदस्य आहेत.

2019 मध्ये भारतरत्न
भारताचे राष्ट्रपतीपद (२०१२-१७) भूषवलेल्या मुखर्जी यांना २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च भारतरत्न या सन्मानाने गौरव करून, त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. मुखर्जी यांच्या राजकीय जीवनाला खऱया अर्थाने सुरवात झाली ती, १९६९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांनी राज्यसभेवर निवडून आणल्यानंतरच. काँग्रेस पक्षात आणि विविध सरकारात मुखर्जी यांनी अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी आपल्या अभ्यासूपणाचा ठसा उमटवला, काँग्रेसच्या कोअर टिममध्ये अनेक दशके ते टिकून राहिले, त्यामागे त्यांची उपयुक्तता, व्यूहरचना, अभ्यासूपणा, सर्वांशी असलेले सौहार्दाचे निकटचे संबंध कारणीभूत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com