दिनेश त्रिवेदींचा नाट्यमय राजीनामा; राज्यसभेत घोषणा

दिनेश त्रिवेदींचा नाट्यमय राजीनामा; राज्यसभेत घोषणा

नवी दिल्ली - तृणमूल कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य व माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेत आज नाट्यमयरीत्या तृणमूलला व खासदारपदालाही सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. यामुळे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक झटका बसला आहे. ‘तृणमूलमध्ये आपल्याला गुदमरल्यासारखे वाटते आहे,' असे सांगणाऱ्या त्रिवेदी यांना भाजपने राज्यसभा प्रवेशाद्वारे सत्तेचा ‘ऑक्‍सिजन' पुरविण्याची जय्यत तयारी केली असून गुजरातमधील एका रिक्त जागेवरून त्यांना पुन्हा वरिष्ठ सभागृहात आणण्याची सज्जता सत्तारूढ पक्षाने केल्याची माहिती आहे. 

अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूलच्या वतीने बोलताना अखेरीस त्रिवेदींनी अचानक रूळ बदलले. ते म्हणाले की, प्रत्येक माणसाच्या जीवनात एक क्षण असा येतो की त्याला त्याच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू येतो. देश मोठा की पक्ष मोठा, असा प्रश्‍न माझ्याही जीवनात आला आहे. जेव्हा मी पहातो की देशात काय परिस्थिती आहे, सारे जग भारताकडे आज आशेने पाहात आहे. माझ्याने आता सहन होत नाही. मला गुदमरल्यासारखे वाटत आहे. मी देशासाठी, बंगालसाठी माझा राजीनामा देत आहे. दरम्यान, त्रिवेदी यांनी जेव्हा आज राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना, असे करता येत नाही. संसद सदस्यत्वाच्या राजीनाम्याची प्रक्रिया असते. त्यानुसार तुम्हाला अध्यक्षांना राजीनामा पत्र लिहावे लागेल, असे बजावले. त्रिवेदी यांच्या राजीनामा घोषणेनंतर काही मिनिटांत भाजपचे बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे, असे सांगून येत्या १-२ दिवसांत गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्षांच्या उपस्थितीत त्रिवेदी भाजपवासी होतील याचे संकेत दिले. बंगालच्या राजकारणात प्रामाणिक लोकांना तृणमूलमध्ये सन्मानाने वागवले जात नाही, असेही ते म्हणाले. 

सुमारे ९ वर्षांपूर्वी यूपी सरकारमध्ये ममता यांच्या जागी रेल्वेमंत्री झालेले त्रिवेदी यांनी रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी तिकिटांच्या दरात १० रुपयांनी वाढ केल्याने ममता बॅनर्जी त्यांच्यावर इतक्‍या भडकल्या होत्या, की त्यांना दुसऱ्याच दिवशी मंत्रिपदावरून पाणी सोडावे लागले होते. त्यानंतर ते तृणमूलमध्ये अस्वस्थच होते. त्रिवेदी यांनी यापूर्वी वेळोवेळी तृणमूलच्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले आहे. २०१२ मध्ये ममता बॅनर्जींचे व्यंगचित्र रेखाटल्याबद्दल जादवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाला झालेल्या अटकेबद्दलही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्ती केली होती. केंद्रात मोदी सरकार आल्यावर २०१५ मध्येही त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात होती. मात्र यावेळेस त्रिवेदी यांनीच  खासदारकी व पक्ष दोन्हीचा त्याग करण्याची घोषणा केली. बंगालमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार होत आहे त्याकडे येथे बसून पाहताना मला विचित्र वाटत आहे. मला येथे पाठविल्याबद्दल माझ्या पक्षाचे व पक्षनेतृत्वाचे मी आभार मानतो. 

तृणमूल पक्षाला फरक पडणार नाही: सौगत रॉय 
त्रिवेदी यांच्या राजीनाम्याचे दुःख आहे. पण त्यांच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडणार नाही, असे तृणमूलचे ज्येष्ठ नेते, खासदार सौगत रॉय यांनी म्हटले आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याचे सांगून रॉय म्हणाले, की त्रिवेदी यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र ते राजीनामा देतील याची कल्पना नव्हती. त्रिवेदी हे जमिनीवरील नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यावर ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्यसभेत आणले होते असेही रॉय यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com