काँग्रेसचे चार आमदार राजीनामा देणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

कारवाई होण्यापूर्वीच ते आमदारपदाचा राजीनामा देण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, राजीनामा दिल्यानंतर तो केव्हा स्वीकारावयाचा हा सभापतींचा अधिकार आहे.

बंगळूरु- व्हीप जारी करूनही सातत्याने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला व विधिमंडळाच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहिलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव व बी. नागेंद्र यांना अपात्र ठरविण्याची मागणी विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांच्याकडे सोमवारी तक्रार दाखल केली.

या तक्रारीमुळे चारही आमदारांना अपात्र ठरविले जाण्याची भीती आहे. परंतु ही कारवाई होण्यापूर्वीच ते आमदारपदाचा राजीनामा देण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, राजीनामा दिल्यानंतर तो केव्हा स्वीकारावयाचा हा सभापतींचा अधिकार आहे. राजीनामे स्वीकारण्यास ते दिरंगाई करू शकतात. राजीनामा दिल्यानंतर तो किती दिवसांत स्वीकारायचा, याबाबत नियम नाही. राजीनामा स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी सभापतींविरुद्ध न्यायालयात किंवा राज्यापलीकडेही जाता येत नाही. त्यामुळे चारही असंतुष्ट आमदार अडचणीत आले आहेत. विधानसभा सभापती रमेशकुमार, सिद्धरामय्या यांच्या तक्रारीवर आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत या चारही आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला होता. रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव व बी. नागेंद्र यांच्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यांच्या कलम 10 अंतर्गत आमदारपदावरून अपात्र ठरविण्यात यावे, अशी तक्रारीत मागणी केली आहे. या चौघांनाही अनेक वेळा संधी दिली. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावण्यात आला. परंतु त्याचे त्यांनी उल्लंघन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Congress MLAs to resign?