
ऐकावं ते नवलच! OLX वर पंतप्रधान मोदींच्या संसदीय कार्यालयाच्या फोटोसोबत साडेसात कोटी रुपयांमध्ये त्याची विक्री करण्याची जाहिरात टाकली गेली होती.
वाराणसी : आपले जुने सामान खरेदी-विक्री करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या OLX या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संसदीय कार्यालयच विकायला निघालेल्या चार व्यक्तींना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. वाराणसीमधील जवाहरनगरमधील पंतप्रधान मोदींचं संसदीय कार्यालयाच्या विक्री संदर्भातील एक पोस्ट OLX या प्लॅटफॉर्मवर टाकण्यात आली होती. यासंदर्भात पोलिसांनी आज शुक्रवारी सकाळी चार व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. या चारी व्यक्तींची भेलूपुर पोलिस ठाण्यात चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, लवकरच या प्रकरणाचा खुलासा केला जाईल.
हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत 338 रुग्णांचा मृत्यू; 31,087 रुग्णांना डिस्चार्ज
OLX वर पंतप्रधान मोदींच्या संसदीय कार्यालयाच्या फोटोसोबत साडेसात कोटी रुपयांमध्ये त्याची विक्री करण्याची जाहिरात टाकली गेली होती. याठिकाणी विक्रेता म्हणून लक्ष्मीकांत ओझा यांचं नाव लिहलं होतं. जाहीरातीत असंदेखील नमूद करण्यात आलं होतं की हाऊसेज एँड विला, चार बेडरुम-बाथरुम, बिल्ड अप एरिया 6500 स्क्वेअर फूट, दोन मजली भवनात दोन कार पार्किंग सोबतच नॉर्थ-ईस्ट फेसिंग आहे. यासोबत प्रोजक्टचं नाव पीएमओ कार्यालय वाराणसी असं लिहलं गेलं होतं.
गुरुवारी सोशल मीडियावर ही जाहीरात व्हायरल होऊ लागली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी संध्याकाळी OLX वरुन ती पोस्ट डिलीट केली. यासंदर्भात शुक्रवारी सकाळी एसएसपी अमित पाठक यांनी सांगितलं की OLX द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, भेलूपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच मोबाईल नंबरच्या मदतीने चार लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली गेली आहे. लवकरच चार लोकांच्या अटकेची माहिती दिली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.