
रस्त्याकडेला बसलेल्या काही कामगारांना एका कारने धडक मारली. यात एका मुलीसह चार महिलांचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक! अल्पवयीन मुलाने ४ जणांना कारने चिरडलं
हैदराबाद - तेलंगणात एक भीषण असा अपघात घडला आहे. रस्त्याकडेला बसलेल्या कामगारांना कारने चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. तेलंगणातील करीमनगरमध्ये रविवारी ही घटना घडली. रस्त्याकडेला बसलेल्या काही कामगारांना एका कारने धडक मारली. यात एका मुलीसह चार महिलांचा मृत्यू झाला आहे. कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी हा अपघात झाला. यावेळी परिसरात दाट धुके होते. यावेळी अल्पवयीन मुलाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन आदळली. त्यावेळी रस्त्याकडेला बसलेल्या लोकांना कारने धडक दिली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, दुर्घटनेत तीन महिला आणि एका १४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. यात तिघींचा मृत्यू जागीच झाला तर एकीचा मृत्यू रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना झाला.
करीमनगरचे पोलिस आय़ुक्त व्ही सत्यनारायण यांनी सांगितलं की, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या अल्पवयीनाने ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्यानं गाडीचा वेग वाढला. यानंतर गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि चार महिलांच्या अंगावर गाडी गेली. अल्पवयीन मुलगा नववीत शिकत असून त्याच्यासोबत कारमध्ये आणखी दोन अल्पवयीन मित्रही होते. घटनेनंतर तिन्ही अल्पवयीन मुलं गाडी घटनास्थळी सोडून पळून गेले.
हेही वाचा: इलेक्ट्रिक बसचा अपघात; ६ जणांचा मृत्यू, ९ जखमी
दरम्यान, पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आहे. तसंच अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्याची परवानगी देणाऱ्यास ताब्यात घेण्यात आलं आहे. कामगार रस्त्याकडेला असलेल्या झोपड्यांमध्ये राहत होते. त्या झोपड्या काही दिवसांपूर्वी पोलिस आणि नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकत्याच हटवल्या होत्या.
Web Title: Four Women Died After A Speeding Car Driven By A Minor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..