मौलवीशी वाद पडला महागात! पाकिस्तानात चार तरुण ईशनिंदा कायद्याला बळी | Desh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan
मौलवीशी वाद पडला महागात! पाकिस्तानात चार तरुण ईशनिंदा कायद्याला बळी

मौलवीशी वाद पडला महागात! पाकिस्तानात चार तरुण ईशनिंदा कायद्याला बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एका इमामासोबत झालेल्या वादानंतर पाकिस्तानी (Pakistan) पोलिसांनी चार जणांना ईशनिंदेच्या (Blasphemy) आरोपाखाली (Crime) अटक केल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लाहोरच्या पूर्वेकडील शहराजवळील खोडी खुशाल सिंग गावात 18 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. स्थानिक पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने अल जझीराने ही माहिती दिली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून आम्ही त्यांना न्यायालयात हजर केले आहे.

हेही वाचा: गृहपाठ केला नाही म्हणून निर्दयी पित्याने मुलाला लटकावले पंख्याला!

हे चार तरुण मुस्लिम असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, एका ख्रिश्‍चन माणसाच्या अंत्यसंस्काराबाबतची माहिती मशिदीतून जाहीर करण्यास नकार दिल्यानंतर या तरुणांनी स्थानिक मौलवीशी वाद घातला. मशिदीत पोहोचताच त्यांनी मशिदीच्या इमामाला शिव्या द्यायला सुरवात केली. त्यांनी मशिदीचा आणि इस्लामचा अपमान केला.

ईशनिंदा हा पाकिस्तानमध्ये संवेदनशील विषय आहे. कठोर ईशनिंदा कायद्यात काही प्रकारच्या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाचीही तरतूद आहे. अटक केलेल्या चौघांवर पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 295 आणि 298 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत, ज्यात दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे.

पाकिस्तानने ईशनिंदा कायद्यांतर्गत गुन्हेगाराला कधीही फाशी दिलेली नाही, मात्र अपराधाच्या आरोपांवरून जमाव किंवा व्यक्तींकडून हिंसाचार होत आहेत. अल जझीराच्या अहवालानुसार, 1990 पासून अशा हिंसाचारात किमान 79 लोक मारले गेले आहेत.

हेही वाचा: WhatsApp यूजर्स सावधान! 'या' मिळत्याजुळत्या अ‍ॅपमुळे होईल मोठे नुकसान

पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या चार जणांवरील खटला निराधार असल्याचे म्हटले आहे. मानवाधिकार कार्यकर्ता व वकील नदीम अँथनी म्हणाले, "जर एखादा मुस्लिम समाजात सद्भावनेने अशी घोषणा करू इच्छित असेल तर तो कोणाच्याही विश्वासावर हल्ला नाही, तर ते एक चांगले कारण आहे. जर कोणी लाऊडस्पीकरवर अंत्यसंस्काराची घोषणा करत असेल तर ते धार्मिक उल्लंघन कसे होईल?'

loading image
go to top