Friendship Day: भारताच्या कायम पाठिशी उभा राहणारा रशिया

कार्तिक पुजारी
Saturday, 1 August 2020

काश्मीर मुद्द्यावरुन चीन आणि काहीवेळा अमेरिकेनेही संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताविरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, रशियाने वेटोचा वापर करत कायम भारताचा बचाव केला आहे.

नवी दिल्ली- डिसेंबर 1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये  पूर्व पाकिस्तानवरुन (सध्याचा पाकिस्तान) 13 दिवसांचे युद्ध झाले. पूर्व पाकिस्तानमधील निर्वासित मोठ्या प्रमाणात भारतामध्ये येत होता. यावेळी भारताच्या मदतीला आला होता सोविएत यूनियन म्हणजे आताचा रशिया. ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोवियतसोबत शांतता, मैत्री आणि सहकार्याचा करार केला होता. गांधी यांच्या या निर्यणामुळे त्यांना जगभरातून टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, पाकिस्तानसोबतच्या युद्धावेळी सोवियतने भारताला मुत्सद्दी आणि शस्त्रास्त्र अशा दोन्ही पद्धतीची मदत केली होती. 

नेपाळ रचतोय भारताविरोधात कट? लिपुलेखमध्ये चिनी सैन्य तैनात

15 जून रोजी भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाल्यानंतरही 23 जून रोजी रशियाने त्रिपक्षीय बैठक आयोजित केली होती. ज्यात भारत, चीन आणि रशिया यांचा समावेश होता. शिवाय भारताच्या विनंतीनंतर रशियाने दोन तीन महिन्यांच्या कालावधीत शस्त्रास्त्र उपकरणे देण्याचं मान्यही केलं आहे. यावरुन रशिया आणि भारतामधील संबंध लक्षात येऊ शकतील.

सध्या भारत रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही राष्ट्रांशी मैत्रीचे संबध ठेवताना भारताला तारेवरची कसरत करावी लागत आहे. काहींच्या मते अमेरिकेसोबत भारताचे संबंध अधिक दृढ बनत चाललले आहेत. शिवाय अमेरिकेलाही आशियामध्ये एक प्रबळ साथीदार हवा होता. त्यामुळे अमेरिकेने भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. मात्र, अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध कायम चढ उताराचे राहिले आहेत. दुसरीकडे रशिया आणि भारताचे संबंध कायम स्थिर राहिले आहेत. 

भारत आणि रशियाचे संबंध 1971 पासून सुरु झालेले नाहीत. 1950 पासूनच सोवियतने भारताला विकास कामात मदत केली आहे. त्यानंतर 1960 पासून लष्करी मदत देणे सुरु केले आहे. 1970 साली भारताने पहिल्यांदा अणु चाचणी केली होती. त्यावेळी अमेरिकेने भारताच्या या कृतीचा निषेध केला होता. तसेच भारताने आण्विक शस्त्रे बाळगू नये असं अमेरिकेनं सुनावलं होतं. त्यावेळी सोवियतने भारताला पाठिंबा दिला होता. 1970 ते 1980 च्या काळात सोवियतने भारताची लष्करी शक्ती वाढवण्यासाठीही मोठी मदत केली आहे. 

कोरोना लस संशोधनात रशिया सगळ्यांत पुढं; लसीकरण सुरू होणार?

रशियाने जम्मू-काश्मीर प्रश्नाबाबतही कायम भारताला पाठिंबा दिला आहे. काश्मीर मुद्द्यावरुन चीन आणि काहीवेळा अमेरिकेनेही संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताविरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, रशियाने वेटोचा वापर करत कायम भारताचा बचाव केला आहे. 1957, 1962 आणि 1971 मध्ये संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्वावर हस्तक्षेप करु पाहिला होता. त्यावेळी रशिया या एका देशानेच वेटोचा वापर करत भारताला खंबीर साथ दिली होती. 2019 मध्ये जेव्हा भारताने जम्मू-काश्मीरचा विषेश दर्जा काढून घेतला, तेव्हा रशियाच पहिला देश होता ज्याने ही अंतर्गत बाब असल्याचं म्हटलं होतं.

1991 साली सोवियत युनियनचे विघटन झाले. याचवेळी भारतात 'खाऊजा'चे युग सुरु झाले. त्यामुळे भारत अधिकाधिक अमेरिकेकडे पाहू लागला. 1990 नंतर भारत-रशियामधील व्यापरही कमी होत गेला आहे. असे असले तरी भारत आजही लष्कर, नौदल आणि हवाईदलामध्ये मोठ्या प्रमाणात रशियन शस्त्रस्त्रांचा वापर करतो. शिवाय 2000 मध्ये रशियाला औषधांचा पुरवढा करणारा जर्मनीनंतर दुसरा देश ठरला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship Day Russia stands by India every time