G-20 Conference : भारत दक्षिणेचा आवाज होईल; एस. जयशंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

G-20 Conference

G-20 Conference : भारत दक्षिणेचा आवाज होईल; एस. जयशंकर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विषयांवर परस्पर सहमतीने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न राहील असे म्हटले आहे. ते ‘जी-२० युनिव्हर्सिटी कनेक्ट’ या उपक्रमामध्ये बोलत होते. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका (दक्षिणेचा) यांचा आवाज होण्याचा भारत प्रयत्न करेल. कारण याच भागाला विकसित जगामध्ये ध्रुवीकरण आणि संघर्षाची सर्वाधिक झळ बसली असल्याचे ते म्हणाले.

सगळ्यात मोठा लोकशाहीप्रधान देश या नात्याने भारताकडे आलेले ‘जी-२०’ चे अध्यक्षपद हे उत्तम सल्लागाराचे, समन्वयाचे आणि भक्कम निर्धाराचे असेल, असेही जयशंकर म्हणाले. ते सुषमा स्वराज भवनमध्ये आयोजित विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत होते. देशभरातील ७५ विद्यापीठांचे विद्यार्थी व्हर्च्युअली या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

योग्य मुद्यांवर लक्ष हवे

आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत नाजूक स्थिती निर्माण झाली असताना भारताकडे ‘जी-२०’ चे अध्यक्षपद आले आहे त्यामुळे जागतिक नेत्यांनी आता योग्य मुद्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे , ज्या घटकांचा जगावर सर्वाधिक परिणाम होतो असे घटक यामध्ये केंद्रस्थानी असायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘मिशन लाइफ’चाही उल्लेख

अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, सर्वांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा, क्लायमेट चेंज आणि त्याअनुषंगाने न्याय देण्याचा प्रयत्न भारत करेल. आम्ही दक्षिणेचा आवाज बनायला हवे. चिरंतन विकास, जागतिक तापमानवाढीविरोधात ठोस कृती आणि त्यामाध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न यावर आपण भर द्यायला हवा, असे आमचे ठाम मत आहे. सामूहिक कृती कार्यक्रमाला बळ देण्यासाठी भारताने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी ‘मिशन लाइफ मोहिमेचा देखील उल्लेख केला. या कार्यक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीशकुमार, ‘जी-२०’ साठीचे शेरपा अमिताभ कांत, देशाचे ‘जी-२०’ साठीचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन शृंगला आणि पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा हे उपस्थित होते.

टॅग्स :AfricaAsiaG - 20 summit