
नवी दिल्ली: ‘‘आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात ‘गगनयान’ मोहीम ही एक महत्त्वाचा अध्याय आहे. या मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे शुभांशू शुक्ला आणि या मोहिमेत निवड झालेले अन्य तिघे अंतराळवीर हे देशासाठी मौल्यवान हिऱ्यांप्रमाणे असून ते राष्ट्रीय आकांक्षांची पूर्तता करणारे आहेत,’’ असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले. येथील सुब्रतो पार्क येथे हवाई दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गगनयानसाठी निवड करण्यात आलेल्या चार गगनयात्रींचा विशेष सत्कार करण्यात आला. ॲक्सिओम-४ मोहिमेतील शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी सहभागाबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.