अरविंद केजरीवालांच्या मास्टरस्ट्रोकमुळे आपची हिंदूविरोधी प्रतिमा बदलणार? नेमकं प्रकरण काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal Currency Statement

अरविंद केजरीवालांच्या मास्टरस्ट्रोकमुळे आपची हिंदूविरोधी प्रतिमा बदलणार? नेमकं प्रकरण काय?

नोटेवर लक्ष्मी, गणपतीची प्रतिमा कोरा, अशी सूचना खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या हेतूनं केजरीवालांनी ही मागणी केली आहे. तर तिकडे केजरीवालांच्या मागणीनंतर भाजप नेत्यांनी आप आणि केजरीवालांवर निशाणा साधला. त्यामुळे केजरीवालांनी आताच ही मागणी का केली? याचा राजकीयदृष्ट्या आपला कितपत फायदा होऊ शकतो?

आप नेते अरविंद केजरीवाल यांनी ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशीच एक मोठा बॉम्ब फोडलाय. ते म्हणालेत भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबतच देवी लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिमा कोरण्याची विनंती केली आहे.

आता केजरीवालांनी हिंदू देवदेवतांचा उल्लेख केला आणि भाजप नेते शांत बसले, असं कसं होईल? भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केजरीवालांवर हल्लाबोल करतच त्यांनी कसा यू-टर्न घेतला, यावर भाष्य केलंय भाजपनं केजरीवालांची ही भूमिका म्हणजे सोंग असल्याचं म्हटलं तर तिकडे काँग्रेसकडून केजरीवाल हे भाजपचाच छुपा अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोप करण्यात आला.

भाजप आमदार नितेश राणेंनी मराठा प्रतिमा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली २०० रुपयांच्या नोटेचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले, "ये परफेक्ट है (हे योग्य आहे)". त्यामुळे आता केजरीवालांच्या नोटांवरील सूचनेवरुन राजकारण रंगताना दिसतंय. पण केजरीवालांना ऐन दिवाळीत श्री गणपती आणि देवी लक्ष्मीची प्रतिमा छापण्याचं कसं सुचलं तर त्याला एखादं लहान मूलही सांगेल ते म्हणजे गुजरातच्या निवडणुका.

दिल्लीनंतर पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवलेल्या केजरीवालांचं लक्ष्य आता गुजरातकडे लागलंय हे नक्कीच. त्यातच राजधानी दिल्लीत केंद्रीय यंत्रणांकडून आप नेते मनिष सिसोदियांवर होणारी कारवाई पाहिली तर, भाजप आपला वेळीच घेरण्याची रणनीती आखताना दिसतंय.

चीनच्या नोटेवर माओ झेडाँग, पाकिस्तानच्या नोटेवर मोहम्मद अली जीना आणि भारतीय नोटांवर महात्मा गांधींची प्रतिमा आहे. तरी, आता केजरीवालांच्या सूचनेप्रमाणे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं गांधींसोबतच आपल्या भारतीय नोटांवर देवी लक्ष्मी आणि गणपतीचीही प्रतिमा लावणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. तर तिकडे राम मंदिराच्या ठिकाणी रुग्णालय बांधावं, बिल्कीस बानो प्रकरणातही केजरीवालांनी धारण केलेलं मौन पाहता ते भाजप-काँग्रेसच्या निशाण्यावर येणार नाहीतर काय?