'गांधी-नेहरू कुटुंब हा ब्रँड'

पीटीआय
Saturday, 17 August 2019

गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पक्ष चालविणे अवघड जाऊ शकते. राजकारणातही "ब्रॅंड' असतो. सध्याची भाजपची परिस्थिती पाहता, मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त भाजप इतके यश मिळवू शकतो काय?

- अधीररंजन चौधरी, काँग्रेस नेते

कोलकता : गांधी-नेहरू कुटुंब हा "ब्रँड' असल्याने त्याबाहेरील व्यक्तीला काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणे अत्यंत अवघड जाऊ शकते, असे मत काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी व्यक्त केले आहे. 

'पीटीआय'शी बोलताना चौधरी म्हणाले की, गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पक्ष चालविणे अवघड जाऊ शकते. राजकारणातही "ब्रॅंड' असतो. सध्याची भाजपची परिस्थिती पाहता, मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त भाजप इतके यश मिळवू शकतो काय? त्यामुळे आमच्या पक्षातही गांधी कुटुंब अपरिहार्य आहे. त्यांच्याइतके वलय आमच्या कोणत्याच नेत्याकडे नाही. ही वस्तुस्थिती आहे.

तसेच देश सध्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात अडकला असून या परिस्थितीला तोंड देण्यासाठी निश्‍चित विचारधारा आणि देशभर संपर्काचे जाळे असलेला कॉंग्रेसच योग्य पक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला. कोणतीही विचारधारा नसलेले प्रादेशिक पक्ष कमकुवत होण्यावरच कॉंग्रेस पुन्हा प्रबळ होणे अवलंबून असल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली. 

सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी नेतृत्व देण्याच्या निर्णयाचे अधीररंजन चौधरी यांनी समर्थन केले. "सोनिया यांनी आधीही कॉंग्रेसला अडचणीतून बाहेर काढले आहे. यावेळी त्या नेतृत्व स्वीकारण्यास तयार नव्हत्या. मात्र, पक्षाची अडचण आणि ज्येष्ठ नेत्यांची विनवणी मान्य करून त्यांनी हे पद स्वीकारले आहे,' असे चौधरी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gandhi Nehru family is brand says Adhir Ranjan Chowdhury