Ganesh Chaturthi 2022 : विहिंपतर्फे दिल्लीत गणेशोत्सवाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

Ganesh Chaturthi 2022 : विहिंपतर्फे दिल्लीत गणेशोत्सवाचे आयोजन

नवी दिल्ली : दिल्ली आणि परिसरात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर संघपरिवारानेही यात सहभागी होण्याचे ठरविले आहे. विश्व हिंदू परिषदेनेही यंदा दिल्लीतील गणेशोत्सवात सक्रिय सहभाग घेण्याचे ठरविले असून नेहरू नगर मंदिर सभेच्या सनातन धर्म मंदिराच्यावतीने गणेशोत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट ते चार सप्टेंबर या काळातील पाच दिवसांच्या गणेशोत्सवात गणेशाच्या १०८ मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे.

दिल्ली व परिसरात छठ पूजेचा जोर असतो. गणेशोत्सवाचे आयोजन मात्र मुख्यतः मराठी मंडळे करीत असतात. महाराष्ट्र सदनात सरकारी गणेशोत्सव साजरा होतो. याशिवाय दिल्ली हाट, दिल्ली मराठी प्रतिष्ठान, मराठा मित्रमंडळाचे चौघुले विद्यालय, नूतन मराठी शाळा, सार्वजनिक उत्सव समिती, लक्ष्मीनगर मंडळ आदी मराठी संस्थांच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. यात मान्यवर कलाकारांना बोलावून विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सार्वजनिक उत्सव समितीच्या कार्यक्रमांत तर पु. ल. देशपांडे, सुधीर फडके अशा कित्येक नामवंतांनी उपस्थिती लावली आहे.

निवडक अपवाद वगळले तर भाजप-संघपरिवार गणेशोत्सवात फारशी सक्रियता दाखवत नसे. कोरोनाचा ओसरल्यापासून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. विशेषतः पूर्व दिल्लीत (यमुनापार) तसेच दिल्लीच्या सीमा भागांतील गणेशोत्सव मंडळांची संख्या महाराष्ट्राची आठवण करून देईल इतकी वाढली आहे.

नेत्यांच्या घरी गणपती

दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री दिवंगत वसंत साठे, सुशीलकुमार शिंदे आदींच्या निवासस्थानी गणेशोत्सवाची अक्षरशः ‘धूम’ असे. भाजपच्या वर्तुळात दिवंगत मंत्री अरुण जेटली निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना करत असत. सजावटीसाठी ते जुन्या काळातील काही मराठी पत्रकारांशीही चर्चा करीत असत. सध्या सुनील देवधर व अन्य काही पक्षनेतेही गणेशाची प्रतिष्ठापना करतात.

Web Title: Ganesh Chaturthi 2022 Ganeshotsav Organized In Delhi 108 Ganesh Idol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..