esakal | दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये २५ रुग्णांचा मृत्यू; राजधानीत ऑक्सिजनची आणीबाणी

बोलून बातमी शोधा

दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये २५ रुग्णांचा मृत्यू; राजधानीत ऑक्सिजनची आणीबाणी

देशाची राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गेल्या 24 तासात 25 गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये २५ रुग्णांचा मृत्यू; राजधानीत ऑक्सिजनची आणीबाणी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातलं असतानाच आरोग्य सुविधा कमी पडत असल्याचं चित्र अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढल्यानं ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत आहे. देशाची राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गेल्या 24 तासात 25 गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे.याची माहिती रुग्णालय प्रशासनानेच दिली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालयात आणीबाणीची वेळ आली आहे. रुग्णालयाने ऑक्सिजनमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलेलं नाही. मृत्यू झालेले रुग्ण हे गंभीर होते आणि रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहे असंही रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गेल्या 24 तासात 25 सर्वात गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच रुग्णालयाकडे केवळ पुढचे दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे. व्हेंटिलेटर्स आणि बायपॅप काम करत नाहीत. आयसीयू आणि इमर्जनीसमध्ये मॅन्युअल व्हेंटिलेशनची मदत घेतली जात आहे. मोठं संकट यामुळे ओढावण्याची शक्यता आहे. सध्या तात्काळ मदतीची गरज असून 60 रुग्णांचा जीव धोक्यात आहे.

हेही वाचा: विरार दुर्घटना दु:खद! पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत

याआधी सर गंगाराम रुग्णालयातल्या 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी पाच डॉक्टरांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तर इतर डॉक्टरांना होम आयसोलेट करण्यात आलं होतं. हे सर्व डॉक्टर कोरोनाबाधितांवर उपचार करत होते. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं ऑक्सिजनची मागणीही प्रचंड वाढली आहे. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. दिल्लीत गुरुवारी 26 हजार 169 नवीन रुग्ण आढळले. तसंच दिवसभरात 306 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिल्लीत गेल्या दहा दिवसांत कोरोनाने 1 हजार 750 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.