गँगस्टरला मुंबईतून उत्तर प्रदेशला नेताना गाडीचा अपघात, आरोपीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

उत्तर प्रदेशला नेत असताना मध्य प्रदेशातील गुना इथं गाडीला अपघात झाला. यात गँगस्टर फिरोजचा जाग्यावरच मृत्यू झाला.

लखनऊ - गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर फिरोज खान उर्फ शम्मी याला मुंबईत पकडण्यात आलं. त्यानंतर उत्तर प्रदेशला नेत असताना मध्य प्रदेशातील गुना इथं गाडीला अपघात झाला. यात गँगस्टर फिरोजचा जाग्यावरच मृत्यू झाला. या घटनेत आरोपीच्या एका नातेवाईकासह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्यानं हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

गँगस्टर फिरोज खानवर 2014 मध्ये उत्तर प्रदेशात गँगस्टर अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस फिरोजचा शोध घेत होते. मुंबईत त्याला पकडल्यानंतर उत्तर प्रदेशला नेलं जात होतं. तेव्हा रविवारी सकाळी 6 च्या सुमारास गुना जिल्ह्यातील चांचौडा इथल्या जोगीपुरा टोल नाक्याजवळ अपघात झाला.

पोलिस अधिकारी आदित्य सोनी यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशातील लखनऊमधील पोलिस मुंबईतून एका गुन्ह्यात फरार असलेल्या फिरोज खानला अटक करून आणत होते. तेव्हा जोगीपुरा टोल नाक्याजवळ रस्त्याशेजारी गायी होत्या. त्यातील एक गाय अचानक रस्त्यावर आडवी आली आणि तिला वाचवण्याच्या नादात गाडीला अपघात झाला.

हे वाचा - Unlock 5 मध्ये कोणते निर्बंध शिथिल होणार? सरकारकडून आज घोषणेची शक्यता

अपघातामध्ये आरोपी फिरोज खान गाडीतून खाली पडल्यानं जास्त जखमी झाला. तर गाडीमध्ये असलेले एसआय जेपी पांडे, संजीव कुमार आणि गुन्हेगाराचा नातेवाईक अफजल हे जखमी झाले. अपघातानंतर पोलिसांनी हायवे अँब्युलन्समधून तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मात्र गँगस्टर फिरोजचा वाटेतच मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up gangster firoz died road accident coming with police from mumbai