
ओडिशातील कोरोनाग्रस्त तरुण रुग्णालयात ‘सीए’च्या अभ्यासात दंग; जिल्हाधिकारी भारावले
पुणे : लढाई!..ती कोरोनाशी असो, की परीक्षेची. दुर्दम्य आशावादाला कर्तृत्वाची झालर असेल तर ही लढाई तुम्ही हमखास जिंकू शकाल. कोरोनाशी दोन हात करतानाच रुग्णालयात ‘सीए’च्या परीक्षेचा अभ्यास करीत असलेल्या तरुणाने हाच धडा दिला आहे. ओडिशातील तरुणाच्या या जिद्दीला तेथील मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही ‘सॅल्यूट’ केला.
कोरोनाबाधित असलो तरी सकारात्मकता महत्त्वाची असते. सरकारी रुग्णालय असूनही स्वच्छता, जेवणाचा दर्जा, प्रत्येक रुग्णावर बारकाईने लक्ष, मोफत उपचार अन प्रसन्न वातावरणामुळेच मी ‘सीए’चा अभ्यास करू शकतो अन् ही लढाई मी जिंकणारच, असे हा तरुण सांगतोय. ओडिशा राज्यातील गंजम जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.

गंजमचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे
हेही वाचा: कोरोना रुग्णवाढीत भारताला दिलासा, चिंता मात्र कायम!
रुग्णालयात बेडवर हा तरुण अभ्यास करत बसला होता, त्यावेळी गंजमचे जिल्हाधिकारी व मूळचे नगर जिल्ह्यातील विजय कुलांगे यांनी अचानक रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी हा प्रकार समोर आला. याबाबत कुलांगे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी गंजम जिल्ह्यात खूप वाईट परिस्थिती होती. त्यातून धडा घेऊन नियोजन केले. त्याची पाहणी करण्यासाठी मी पीपीई कीट घालून अचानक एका रुग्णालयात गेलो. प्रथम स्वच्छतागृहाची पाहणी केली तर तेथे खूपच स्वच्छता होती. त्यानंतर रुग्णांना भेटण्यासाठी गेलो असता, एक तरुण ‘सीए’चा अभ्यास करत होता. मी बोलत असतानाही त्याचे लक्ष अभ्यासात होते. डॉक्टरांनी सांगितले की, जिल्हाधिकारी आले आहेत. त्यावेळेस त्याने बोलण्यास सुरुवात केली. आजूबाजूला कोरोना रुग्ण असतानाही त्याची तल्लीनता पाहून मी भारावून गेलो. ध्येय अन जिद्द असेल तर, कोणत्याही संकटावर मात करता येते, याचाच धडा त्या तरुणाने दिला.
हेही वाचा: कोरोना रुग्णवाढीत भारताला दिलासा, चिंता मात्र कायम!
कोरोनाबाबत कसे केले नियोजन
१) सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांमार्फत प्रत्येक गावात क्वारंटाईन सेंटर.
२) प्रत्येक गावामध्ये कोविड समिती.
३) नगरपालिकेमध्ये वॉर्डनिहाय कोविड मॉनिटरिंग सिस्टीम.
४) जिल्हास्तरावर कॉल सेंटर व बेड मॅनेजमेंट सिस्टीम.
५) घरी असलेल्या कोरोना रुग्णाला दिवसातून दोन वेळा फोन व मार्गदर्शन.
६) फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून ‘कोविड सेल’ची स्थापना. त्याद्वारे तक्रारींचे निवारण.
७) प्रत्येक कोरोनाबाधित रुग्ण समजण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर सेंटरची स्थापना.
८) प्रत्येक रुग्णाला मोफत उपचार.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध
गेल्यावर्षी गंजम जिल्ह्याला कोरोनाने ग्रासले होते. योग्य उपाययोजना केल्यामुळे मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी होता. त्यासाठी कोविड हेल्थ सेंटर, कोविड हॉस्पिटल व कोविड सेंटरची उभारणी केली. गंजममधील २२ तालुक्यांसाठी ८८ ऑक्सिजन रूग्णवाहिका दिल्या. सध्या जिल्ह्यात ४० ते ४२ ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांना धावपळ करावी लागत नसल्याचे कुलांगे यांनी सांगितले.
Web Title: Ganjam District Collector Vijay Kulange Stunned To See Corona Positive Boy Study For Ca In Odisha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..