esakal | WHOकडून मुलांच्या सार्वत्रिक लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही - नीती आयोग
sakal

बोलून बातमी शोधा

Dr VK Paul.

मुलांच्या सार्वत्रिक लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही - नीती आयोग

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : लहान मुलांसाठी सार्वत्रिक लसीकरणाची जागतीक आरोग्य संघटनेनं अर्थात WHOनं अद्यापही शिफारस केलेली नाही. पण त्यामुळं घाबरुन जाण्याचं कारण नाही. पण देशातील सर्व प्रौढ जनतेच्या पूर्ण लसीकरणावर सध्या आमचा भर आहे, असं नीती आयोगाचे आरोग्य सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.

पॉल म्हणाले, "सध्या देशातील सर्व प्रौढ व्यक्तींचं लसीकरण करण्याकडं आमचं लक्ष आहे. जगभरात सध्या लहान मुलांसाठी खूपच कमी प्रमाणात लसीकरण होत आहे. WHO नं अद्यापही लहान मुलांसाठी सार्वत्रिक लसीकरणाची शिफारस केलेली नाही. पण यामुळं घाबरुन जाण्याचं कारण नाही. यामध्ये काय नवी सुधारणा होतेय याकडे आम्ही लक्ष ठेऊन आहोत"

झायडसच्या लसीची किंमत लवकरच निश्चित होईल

झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्याचा विचार केला जात आहे. या लसीच्या किंमतीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल, असंही यावेळी पॉल यांनी स्पष्ट केलं.

सप्टेंबरच्या अखेरीस कोव्हॅक्सिनला मान्यतेची शक्यता

कोव्हॅक्सिनच्या जागतीक मान्यतेसाठी WHOला वैज्ञानिक तपासण्यांच्या आधारावर निर्णय घेण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आम्हाला आशा आहे की, याबाबत त्वरीत निर्णय घेतले जातील कारण जे लोक कोवॅक्सिन लस घेत आहेत त्यांच्यापैकी अनेकांना परदेशात प्रवास करणे अत्यावश्यक आहे. पण यासाठी जागतीक आरोग्य संघटनेची सहमती महत्वाची आहे.

कोव्हॅक्सिनबाबत सकारात्मक घडामोडींची घडत आहेत. डेटा शेअरिंग, विविध तपासण्यांद्वारे डेटा मूल्यांकनही सुरु आहे आणि आम्हाला खात्री आहे की आपण निर्णयाच्या जवळ आहोत. आम्हाला विश्वास आहे की, सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी सकारात्मक निर्णय येऊ शकतो, असंही डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top