Ghulam Nabi Azad : आझादांनी स्थापन केला ‘आझाद’ पक्ष

जम्मूमध्ये नव्या पक्षाची घोषणा; झेंड्याचेही अनावरण
Ghulam Nabi Azad announced New political Azad party
Ghulam Nabi Azad announced New political Azad party

जम्मू : काँग्रेसबरोबरील पाच दशकांपासून असलेले घरोबा तोडून बाहेर पडलेले वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी नवा पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली. ‘डेमॉक्रॅटिक आझाद पार्टी (डीएपी) असे नव्या पक्षाचे नाव आहे.

आझाद हे सध्या जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. नव्या पक्षाच्या नावाची घोषणा करताना ते म्हणाले, ‘‘अखेर प्रतीक्षा संपली. माझ्या पक्षाचे नाव डेमॉक्रॅटिक आझाद पार्टी आहे. माझ्या पक्षात हुकूमशाही राहणार नाही. पक्षाच्या नावातील आझाद शब्दाचा चुकीचा अर्थ लावू नका किंवा माझ्या वैयक्तिक नावाशी जोडू नका. आझाद म्हणजे माझे नाव नाही तर पक्ष स्वतंत्र असेल आणि कोणताही दबाव नसेल, असा त्याचा अर्थ आहे. हा पक्ष केवळ एक पक्ष नसून एक संस्था आहे. ‘डीएपी’चे स्वरूप लोकशाही असेल आणि लोकशाही नियमांचे पालन करेल.’’

माझी ताकद नगण्य

जम्मू-काश्‍मीरमधील ३७० व्या कलमाबाबत बोलताना आझाद म्हणाले की, हे कलम पुन्हा कधीही लागू केले जाणार नाही, असे मी कधीही म्हटले नव्हते. जर कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मन वळविले तर त्याचे स्वागत आहे. पण माझ्याकडे सध्या तशी ताकद नसल्याने मी ते करू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसबद्दल बोलताना आझाद म्हणाले, की काँग्रेसबरोबर माझी बांधिलकी खूप पूर्वीपासून होती. पण महाविद्यालयीन दशेपासून मी महात्मा गांधी यांचा अनुयायी आहे.

गुलाम नबी आझाद म्हणाले...

  • पक्षाची विचारसरणी नावाप्रमाणे असेल आणि त्यात सर्व धर्मनिरपेक्ष लोक सहभागी होऊ शकतात

  • पक्षात तळागाळापासून निवडणुका होतील

  • आमची आमच्याशीच स्पर्धा आहे. अन्य कोणत्याही पक्षाशी माझी स्पर्धा नाही

  • आमचे कोणाशीही शत्रूत्व नाही

  • जनता सर्वश्रेष्ठ आहे आणि तीच आमचे भवितव्य ठरवेल

  • हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्‍चन हे मानवी हृदयाचे चार कप्पे आहेत

  • निवडणुकीत निम्मी तिकिटे युवकांना देण्‍यात येणार आहेत

‘डीएपी’चा तिरंगी झेंडा

‘‘पक्षाच्या नावातील आझाद हा शब्द त्यांच्या स्वतःच्या नावाशी संबंधित आहे, शिवाय पक्ष स्वतंत्र असेल, असाही त्याचा अर्थ आहे.’’ आझाद यांनी ‘डेमॉक्रॅटिक आझाद पक्षा’च्या झेंड्याचेही अनावरण यावेळी केले. हा झेंडा पिवळा, सफेद आणि गडद निळा यात तीन रंगात आहे. त्यातील पिवळा रंग हा रचनात्मकता आणि विविधतेत एकता अर्थ सांगतो तर सफेद रंग हा शांततेचे प्रतीक आहे. निळा रंग स्वातंत्र्य, खुलेपणा, कल्पना आणि समुद्राच्या तळापासून आकाशापर्यंतच्या सीमांचे निदर्शक आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com