बंडखोर सरयू राय ठरले ‘जायंट किलर’

पीटीआय
Thursday, 26 December 2019

शिबू सोरेन यांचाही झाला होता पराभव
यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचा पोटनिवडणुकीत तामाड मतदारसंघात झारखंड पार्टीच्या गोपाळकृष्ण पातर ऊर्फ राजा पीटर यांनी नऊ हजार मतांच्या फरकांनी पराभव केला होता. हेच पातर एका खून प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पातर यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने पातर यांना धूळ चारली.

रघुवर दास यांचा बालेकिल्ल्यातच १२ हजार मतांनी पराभव
रांची - विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच धूळ चारणारे सरयू राय हे झारखंडमधील दुसरे राजकीय नेते ठरले आहेत. झारखंडचे मावळते मुख्यमंत्री रघुवर दास यांचा जमशेदपूर पूर्व मतदारसंघात राय यांनी दणदणीत १२ हजार मतांनी पराभव करत ते ‘जायंट किलर’ ठरले आहेत. २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गोपाळकृष्ण पातर ऊर्फ राजा पीटर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचा पराभव केला होता.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपचे निष्ठावंत असलेल्या राय यांना पक्षाने तिकीट नाकारले आणि त्यानंतर राय यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात पराभवाचे पाणी चाखण्याची वेळ आणली. 

मावळते मुख्यमंत्री दास यांच्या कार्यशैलीबाबत राय यांनी अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, भाजपच्या पक्षनेतृत्वाने त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीवेळी दास यांच्या आग्रहावरून जमशेदपूर- पश्‍चिम मतदारसंघातून राय यांना भाजपने तिकीट नाकारले. 

भाजप मंत्री म्हणतात, राहुल-प्रियांका तर लाईव्ह पेट्रोल बॉम्ब

जमशेदपूर- पश्‍चिम मतदारसंघाचे राय यांनी दोनदा प्रतिनिधित्व केले होते, तर शेजारच्या जमशेदपूर- पूर्व मतदारसंघाचे नेतृत्व १९९५ पासून दास यांच्याकडे होते. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर राय यांनी बंडखोरी करत दास यांच्या विरोधात जमशेदपूर- पूर्वमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

मंत्रिमंडळात सहभागी असूनही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढणारे राय हे झारखंडमधील पहिलेच नेते ठरले. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि मुख्यमंत्री असलेल्या दास यांचा सुमारे १२ हजार मतांनी पराभव करत राय यांनी आपली ताकद दाखवून दिली. 

ठाकरे सरकारचा आणखी एक दणका; आता लक्ष्य ऍक्सिस बँक

राय यांनी बिहारमधील चारा गैरव्यवहार प्रकरण लावून धरले होते, त्यातूनच पुढे लालूप्रसाद यादव आणि दिवंगत जगन्नाथ मिश्रा या बिहारच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. कोळसा खाण गैरव्यवहारप्रकरणी राय यांनी केलेल्या आरोपांनंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनाही पदावरून जावे लागले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Giant killer turns out to be rebel Saryu Rai