कोरोनावर 103 रुपयांची एक गोळी प्रभावी, कंपनीने दिलीय माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

कोरोनाचा प्रसार भारतात वेगाने होत असून यामुळे देशाची आरोग्य व्यवस्थेवर ताण आलेला आहे. अशा काळात या औषधाला मंजुरी मिळाली आहे.

नवी दिल्ली, ता. २० (वृत्तसंस्था) ः ‘ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स’ या औषध कंपनीने कोरोनाव्हायरसवर औषध तयार केल्याचा दावा केला आहे. याबाबतची माहिती कंपनीने शनिवारी निवेदनाद्वारे दिली. कोरोना विषाणूच्या संसर्गाची सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी ‘फॅविपिराविर’ हे विषाणूविरोधी औषध ‘फॅबीफ्लू’ नावाने तयार केले आहे. 

ऋतू बदलतोय... पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

मुंबईतील या कंपनीने म्हटले आहे की, ‘भारतीय औषध महानियंत्रक’ (डीजीसाआय) संस्थेकडून औषध उत्पादन आणि वितरणाची परवानगी मिळाली आहे. कोरोनावरील उपचारासाठी अशा प्रकारची मंजुरी मिळालेले ‘फॅबीफ्लू’ हे गोळ्यांच्या रूपात सेवन करता येणारे पहिले‘फॅविपिराविर’ औषध आहे, असा कंपनीचा दावा आहे.

‘‘ग्लेनमार्क’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ग्लेन सल्डाना म्हणाले, ‘‘कोरोनाचा प्रसार भारतात वेगाने होत असून यामुळे देशाची आरोग्य व्यवस्थेवर ताण आलेला आहे. अशा काळात या औषधाला मंजुरी मिळाली आहे. ‘फॅबीफ्लू’सारखे प्रभावी उपचार उपलब्ध झाल्यास या व्यवस्थेवरील ताण हलका होण्यात मदत होईल, अशी आशा आहे.’’ 

पावसाळा या ऋतूला आहे जीवघेण्या आजारांचा शाप !

फॅबीफ्लू’चे डोस 

- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध 
- एका गोळीची साधारण किंमत १०३ रुपये 
- पहिल्या दिवशी १८०० मिलिग्रॅमचा डोस 
- नंतर १४ दिवसांपर्यंत ८८०० मिलिग्रॅमचा डोस

बदलत्या वातावरणाचा होतोय आरोग्यावर परिणाम, काळजी घ्या

‘‘वैद्यकीय चाचण्यांदरम्यान कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर ‘फॅबीफ्लू’ परिणामकारक ठरले आहे. हे औषध सेवन करायचे असल्याने उपचारासाठी हा पर्याय सोयीचा आहे. हे औषध देशभरातील रुग्णांना उपलब्ध व्हावे, यासाठी कंपनी सरकार आणि वैद्यकीय क्षेत्राबरोबर काम करणार आहे,’’ अशी माहिती सल्डाना यांनी दिली. हे औषध वापरण्याची सूचना व धोक्याचा इशाराही कंपनीने नमूद केला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: glenmark launches drug FabiFlu effective on covid 19 health