'जननी जन्मभूमी कौल’; एक संधी, गोवा जपण्याची

गोमंतकीय समाज मूढ नाही हे दर्शवणारा हा ‘जननी जन्मभूमी कौल’ यशस्वी करणे हे प्रत्येक स्वाभिमानी गोमंतकियाने आपले आद्य कर्तव्य मानावे.
Gomantak
Gomantak Team eSakal

गोव्यात १९६७ साली एक ऐतिहासिक जनमत कौल घेण्यात आला. पुरोगामित्वाच्या जाणिवा जोपासणाऱ्या एका छोट्याशा भूप्रदेशाने आपली सांस्कृतिक आणि भौगौलिक अभिव्यक्ती एका विस्तृत प्रवाहात अंतर्धान पावू नये म्हणून केलेले प्रगल्भ मतदान या कौलाला ऐतिहासिक बनवून गेले. देशाच्या इतिहासातील या एकमेवाद्वितीय कौलाला ५४ वर्षे उलटली असताना गोव्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जाणिवा तितक्याच दृढ आहेत का असा प्रश्न पडण्याजोगी स्थिती अवतीभवती दिसते आहे. गोव्याच्या पृथक सांस्कृतिक अस्तित्वालाच नख लागण्याची शक्यता बळावते आहे. गोव्याला, गोमंतकियाना याची जाणीव आहे का? त्याच्या अंत:करणात याविषयी काही कोलाहल माजलेला आहे का? सांस्कृतिक स्खलनाच्या या प्रक्रियेला थोपवण्याची मनिशा तो बाळगतो का? की तो केवळ काहींच्या विचार विलसितांचाच भाग आहे? या प्रश्नांच्या मुळाशी जायचे ‘गोमंतक’ने ठरवले आहे. गोमंतमानसांत जिव्हाळ्याचे अधिष्ठान असलेल्या या दैनिकाने माध्यमांच्या जबाबदारीविषयीची पारंपरिक चौकट भेदून एक नवे पाऊल टाकताना गोमंतकियाना काय हवेय, ते जाणून घेण्यासाठी एका नव्या जनमत कौलाचा संकल्प ठेवला आहे. हा ‘जननी जन्मभूमी कौल’ राज्याच्या आणि देशाच्या राजकीय व सामाजिक नेतृत्वाला पुढच्या किमान पन्नास वर्षांसाठीच्या नियोजनासाठी प्रवृत्त आणि कार्यरत करील, हा आमचा विश्वास आहे.

पेडण्यापासून पोळेपर्यंतच्या गोव्याला व्यापणारा हा कौल राजकीय असेल आणि नसेलही. त्याला प्रस्थापित राजकीय अभिनिवेशांचा मुलामा नसेल, पण गोव्याला कसले राजकीय नेतृत्व अपेक्षित आहे, याचे सुस्पष्ट निर्देशन त्यातून मिळेल. कौल घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने निश्चित केलेल्या १६००हून अधिक बुथांच्या प्रारुपाचीच मदत घेण्यात येईल. यातून हा कौल खऱ्या अर्थाने पूर्ण गोव्याला व्यापणारा ठरेल. या कौलांत गोमंतकीय महिलांना सहभागी करून घेतले जाईल. महिलाच का असा प्रश्न येथे उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पण घराची गृहिणी आज खरी कर्तृत्विनी ठरली आहे, ती प्रपंचाला एकहाती पेलत असल्याची उदाहरणे वाढत्या संख्येने समोर येत आहेत. तिची मते प्रगल्भ आहेत आणि त्यांवर विशिष्ट राजकीय विचारसरणीचा प्रभाव पुरुषवर्गाच्या तुलनेत नगण्य आहे. सामाजिक अभिसरणातून होणाऱ्या परिणामांचे, विशेषत: सांस्कृतिक स्खलनाचे तिचे निरिक्षण सुक्ष्म आणि तितकेच सच्चे आहे. संस्कृतीसंवर्धानाची, गोव्याची पृथक ओळख जपण्याची तिची असोशी आणि तिने केलेले कार्य नेहमीच बेदखल राहिले, पण आपल्या परीने तिने तो पर्वत करांगुळीवर धरलेला आहे. आता, वेळप्रसंग पाहून ती राजकीयदृष्ट्याही अभिव्यक्त होते आहे आणि आपल्या कर्तृत्वाची छाप त्या क्षेत्रावरही सोडते आहे. जन्मभूमीच्या व्यथा- वेदना जननाच्या वेणा अनुभवणाऱ्या स्त्रीइतक्या पुरुषाना कळणे शक्य नाही. तिचे आकलन केवळ भावनिकच नाही तर प्रापंचिक अर्थकारणातून तिने मिळवलेले भानही मोलाचे आहे. एक मतदार म्हणून गोमंतकीय स्त्री संख्येनेही पुरुषाला भारी आहे. आजवर तिच्या मताला गृहित धरले गेले आणि दुर्लक्ष करण्यात आले. याची भरपाई ‘जननी जन्मभूमी कौल’ करील. त्यातून गोवा कसा विचार करतोय, त्याला काय हवेय, राजकारणाकडून त्याचा कोणत्या अपेक्षा आहेत, याचे स्वच्छ, अभिनिवेशविरहित चित्र समोर येईल.

आरोग्य, धन आणि संस्कृती या तीन विषयांवरली गोमंतकीय स्त्रीची मते या कौलातून व्यक्त होतील. त्यांच्या मतदारसंघातील राजकीय नेत्यांचे याच तीन क्षेत्रातील या नेत्यांच्या क्षमतेचे तौलनिक मुल्यांकन त्यानी करावे, अशी अपेक्षा आहे. तिन्ही क्षेत्रांचा राजकारणाशी असलेला दृढ संबंध लक्षात घेतल्यास या कौलाचे महत्त्व ध्यानी यावे. आरोग्य हा नित्य चर्चेच्या ऐरणीवर राहाणारा विषय. गोव्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा अन्य राज्यांच्या तुलनेत विस्तृत आणि प्रगतही मानली जाते. तिच्या भविष्यकालीन विस्ताराविषयीच्या गृहस्वामिनींच्या कल्पना आणि विद्यमान स्थितीविषयीचा अभिप्राय महत्त्वाचा आहे. कौटुंबिक स्वास्थ्य हा स्त्रीच्या भावविश्वाशी निगडीत विषय असून तिचे मत कधीही पुरुषापेक्षा संतुलित असेल. ‘धन’ हा विषय धनसंचय अशा अर्थाने न घेता, सुबत्ता ह्या अर्थाने घ्यायचा आहे. रोजगार, आर्थिक स्थैर्य, प्रगतीच्या संधी याविषयीचे स्त्रीचे मत अर्थातच धोरणकर्त्यांसह राजकीय क्षेत्रालाही दिशादर्शक ठरेल. विशेषत: राजकीय नेत्यांच्या भौतिक विकासाच्या कल्पना आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यानी उचललेली पावले यांचे मुल्यांकन या कौलातून होणार आहे. संस्कृती हा तर मानवजातीच्या अस्तित्वाला सिद्ध करणारा मुलाधार. गोमंतकीय संस्कृती आपल्या नित्याचरणातून सहजतेने जपणारी गोमंतकीय स्त्री सध्याच्या सांस्कृतिक विघरणाकडे कशी पाहातेय, याचा वेध हा कौल घेणार आहे. त्यातून गोव्याच्या भविष्यकालीन वाटचालीचे दिशानिर्देशन अभिप्रेत आहे.

राजकीय पक्षांचा या कौलांतला सहभाग आम्ही गृहीत धरत आहोत. राजकीय पक्ष वा संघटना काही मुल्यें बाळगून आपले मार्गक्रमण करतात. कालौघात अनेक कारणांस्तव या मुल्यांपासून फारकत घेण्याची वेळ येत असली तरी त्यामुळे त्या मुल्यांवरली निष्ठाच ढळलीय, असे म्हणणे योग्य नसते. राजकारण आणि राजकारण्याना वाळीत टाकण्याचा कर्मठपणा आम्हाला नकोय, त्यांचा सहभाग मोलाचाच आहे. आज राजकीय पक्षांच्या मुल्यनिष्ठेचा क्षय होत असेल तर त्याला समाजही तितकाच कारणीभूत असतो. हा क्षय रोखण्याचे बळ जनमत कौलात असते. त्यातून समाजाची वैचारिक क्षमताही दिसते. राजकीय पक्ष आणि संघटनाना आपले वेगळेपण अधोरिखीत करणाऱ्या धारणांचे समयोचित आहेत की नाही, याचे आकलन हा ‘जननी जन्मभूमी कौल’ देईल. तो राजकीयदृष्ट्या तटस्थ असेल तरीही राजकारणाला दिशा देण्याचे सामर्थ्य त्याच्यात असेल. देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असून हे गोवा मुक्तीचे हिरक महोत्सवी वर्षही आहे. सिंहावलोकनासाठी आणि नव्या उद्दिष्टांच्या आरेखनासाठी याहून चांगला मुहुर्त लाभणार नाही. राज्याच्या भविष्यकालीन वाटचालीला आकार देणारी विधानसभा निवडणुकही हाकेवर येऊन ठेपलेली आहे. राजकीय पक्षांच्या तयारीने गती घेतली आहे. उसनी, आयत्या वेळी स्विकारलेली संधीसाधू आक्रमकता, मुल्यविहिन समावेशकता अशा अंगाने जाणाऱ्या या तयारीची दिशा मतदारांना मान्य आहे का; याचा अंदाजही हा कौल घेणार आहे. गोव्याचे वर्तमान नितळ व्हावे आणि भविष्य आश्वासाक असावे या एकमेव हेतूने ‘गोमंतक’ने हे शिवधनुष्य उचलायचा निग्रह केला आहे. माध्यमांच्या उत्तरदायित्वाच्या आमच्या कल्पनेचीच ही अभिव्यक्ती आहे आणि तिला अपेक्षित यशप्राप्तीकडे नेताना एका प्रदिर्घ लोकलढ्याची तयारीही आम्ही केली आहे. आपले भवितव्य आपणच निश्चित करायचे असते, दान पडेल तसे मार्गक्रमण करणे मूढांचे काम! गोमंतकीय समाज मूढ नाही हे दर्शवणारा हा ‘जननी जन्मभूमी कौल’ यशस्वी करणे हे प्रत्येक स्वाभिमानी गोमंतकियाने आपले आद्य कर्तव्य मानावे, हीच विनंती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com