रजनीकांत यांच्या निर्णयानंतर चाहते खूष; ट्विटरवर जोरदार रिऍक्शन्स

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 December 2020

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारण न येण्याचा निर्णय जाहीर केला.

नवी दिल्ली- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारण न येण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. रजनीकांत यांच्याकडून राजकारण येण्याची जय्यत तयारी सुरु होती. यासंबंधी त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीही घेतल्या होत्या. 2021 च्या जानेवारी महिन्यात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा करण्याची शक्यता होती. पण, अचानक त्यांची तब्येत बिघडली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याच्या 2 दिवसानंतर त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला.

रजनीकांत यांच्या राजकारणात न उतरण्याच्या निर्णयावर कमल हसन नाराज
 

रजनीकांत यांच्या निर्णयाने अनेकांची निराशा झाली असली, तरी अनेकांनी निर्णयाचं स्वागत व्यक्त केलं आहे. सध्या ट्विटरवर 'good decision' चांगला निर्णय हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेकांनी ट्विट करत रजनीकांत यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी एक चांगला निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. आरोग्य सर्वाधिक महत्वाचे आहे. तसेच रजनीकांत यांना राजकीय व्यासपीठावर पाहण्यापेक्षा आम्हाला त्यांना चित्रपटाच्या पडद्यावर पाहायला आवडेल, अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली आहे. 

 

रजनीकांत यांनी जो निर्णय घेतला आहे, तो एखादा सुपरस्टारच घेऊ शकतो, असं एकाने म्हटलं आहे. रजनीकांत यांनी कोणताही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, असं एका चाहत्याने म्हटलं. थलायवा आम्हाला सिनेमाच्या पडद्यावरुन असाच आनंद देत रहा, असं एकाने म्हटलं. सुपरस्टार आणि मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी रजनीकांत यांच्या निर्णयामुळे निराश झाल्याचं म्हटलं आहे, पण माझ्यासाठी त्यांची तब्येत अधिक महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले.  

दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या डिक्शनरीत अशक्य असा शब्द नाही असंच त्याचे चाहते म्हणतात. दक्षिणेत तर रजनीकांत यांची देवासारखी पूजा केली जाते. रजनीकांत यांच्याबद्दल अतिशयोक्ती असलेले विनोदही लोकप्रिय आहेत. क्रिकेट खेळायला लागला तर तो एकटा 15 विकेट घेऊ शकतो, एका चेंडूत 6 सिक्स मारू शकतो किंवा अशा गोष्टी ज्या कल्पनेतही अशक्य वाटतात त्या रजनीकांत सहज करू शकतो असं सहज म्हटल जातं. पण त्याच रजनीकांत यांना आज चाहत्यांची माफी मागावी लागली. आपल्याला एखादी गोष्ट जमणार नाही हे सांगण्याचं दु:ख फक्त मलाच माहिती असं त्यांनी एका पत्रातून म्हटलंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good decision hashtag trending on tweeter after rajnikant decision