गोव्यात सरकारी अॅप टॅक्सी; पुढील महिन्यात सुरवात

अवित बगळे
बुधवार, 27 जून 2018

पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर याबाबत म्हणाले, गोव्यातील टॅक्‍सी सेवेवर आधारित अपचे लॉंच टॅक्‍सी चालक, पर्यटक आणि स्थानिक अशा सर्व भागधारकांसाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल आणणार आहे.

पणजी - गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) गोवामाइल्स हे टॅक्सी सेवा अॅप पुढील महिन्यात सर्वांसाठी खुले होणार आहे. सध्या हे अॅप प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. गोव्यातील 2 हजार 800 टॅक्‍सी चालकांनी हे अॅप वापरण्यात रस दाखवला असून प्रवाशांकडून येणारी मागणी वाढल्यानंतर चालकांच्या संख्येतही वाढ होण्याची दाट शक्‍यता आहे. हा प्रकल्प प्रवासाचे सोयीस्कर साधन मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. 

पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर याबाबत म्हणाले, गोव्यातील टॅक्‍सी सेवेवर आधारित अपचे लॉंच टॅक्‍सी चालक, पर्यटक आणि स्थानिक अशा सर्व भागधारकांसाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल आणणार आहे. मला खात्री आहे, की गोव्यातील सर्व पर्यटक टॅक्‍सी चालक या डिजिटल यंत्रणेमध्ये सहभागी होतील म्हणजे गोवा राज्य अशाप्रकारची सेवा यशस्वीपणे कार्यरत असलेल्या इतर राज्यांच्या मागे पडणार नाही. 

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) अध्यक्ष  निलेश काब्राल म्हणाले,गोव्यातील एक दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून त्यांना गोवामाइल्स या टॅक्‍सी अॅपची माहिती देण्यासाठी आम्ही सार्वजनिक माहिती अभियान राबवणार आहोत. सर्वसामान्य लोकांकडून आम्हाला उदंड प्रतिसादाची अपेक्षा असून ते हे अॅप पर्यटक मोठ्या प्रमाणावर डाउनलोड करतील तसेच दैनंदिन प्रवासासाठी वापरतील अशी खात्री आहे. 

ते म्हणाले, अॅपवर आधारित ही टॅक्‍सी सेवा डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देईल, पर्यटकांसाठी प्रवास सोपा करेल, तर टॅक्‍सीचालकांना चांगले उत्पन्न देईल. या उपक्रमामुळे ग्राहकांना पूर्णपणे नवा अनुभव मिळेलच, शिवाय टॅक्‍सीचे भाडे भरणे सोपे व सुरक्षित होईल. हे पहिले अॅसे अप आहे, जे स्थानिक गोमंतकीय टॅक्‍सी चालकांच्या खिशावर कोणताही परिणाम करत नाही व ते अतिशय वेगवान आणि सोयीस्कर पद्धतीने राबवले जाते. यातून त्यांनाही या डिजिटल यंत्रणेमध्ये भागीधारक बनून पर्यटकांना चांगला ग्राहकानुभव देता येतो. 

गोवामाइल्सचे व्यवस्थापकीय संचालक उत्कर्ष दाभाडे म्हणाले, गोवामाइल्स प्रवाशांना परवानाधारक, व्यावसायिक टॅक्‍सी चालक मिळवून देण्यासाठी मदत करते. त्यांना आपण कशाचे पैसे भरत आहोत याची कल्पना येते आणि मोबाइल अपद्वारे कॅब कुठे जात आहे हे पाहाता येते. गोवामाइल्स सध्याच्या टॅक्‍सी कंपन्यांशी भागिदारी करून आणि त्यांच्यासोबत काम करून चालकांना जास्त ग्राहक मिळवून देण्यासाठी मदत करेल. 

गोवामाइल्स हे प्रवाशांना अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मद्वारे मोफत डाउनलोड करता येणार आहे. प्रवाशाने टॅक्‍सीची विनंती केल्यानंतर सर्वात जवळची टॅक्‍सी ठिकाण पाहिल आणि पिकअप तसेच येण्याची वेळ निश्‍चित करेल. त्याचबरोबर यामध्ये लास्ट ड्रायव्हर नावाचे वैशिष्ट्य आहे, ज्याच्या मदतीने प्रवाशांना तातडीने चालकांशी कनेक्‍ट करता येते आणि टॅक्‍सीमध्ये राहिलेल्या वस्तू लगेचच मिळवता येतात. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government app taxi in Goa Starting next month