Single parent साठी मोदी सरकारची मोठी घोषणा; सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी 'गिफ्ट'

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 27 October 2020

मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दुसरं मोठं गिफ्ट दिलं आहे.

नवी दिल्ली- मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दुसरं मोठं गिफ्ट दिलं आहे. आता एकल पालकत्व असणाऱ्या पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही चाईल्ड केअर रजा मिळू शकणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी याची माहिती दिली आहे. एकल पुरुष पालकत्वअंतर्गत लग्न न करता पालकत्व स्वीकारलेले, विधूर आणि घटस्फोट झालेल्या पुरुषांचा समावेश होत असून त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.  

गुजरात दंगलः 9 तासांच्या चौकशीत मोदींनी एक कप चहाही घेतला नव्हता

हा एक मोठा आणि पुरोगामी निर्णय असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले आहेत. विभागाने निर्णय याआधीच घेतला होता, पण तो लोकांपर्यत पोहोचला नव्हता, असं त्यांनी सांगितलं. सरकारी कर्मचाऱ्यांना मुलांची काळजी घेण्यासाठी पहिल्या वर्षी रजेच्या दिवशीचे 100 टक्के वेतन मिळणार आहे, तर दुसऱ्या वर्षी रजेच्या दिवशीचे 80 टक्के वेतन मिळणार आहे. आतापर्यंत केवळ महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांना दोन वर्षांची पेड चाईल्ड केअर रजा मिळायची.

अपंग असलेल्या मुलांच्या बाबतीत सरकारने अधिक सवलती दिल्या आहेत. याआधी अपंग मुलांच्या काळजीसाठी 22 वर्षापर्यंतत रजा घेता येत होती, आता वयाची अट काढून टाकण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वी 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली होती. कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीमार्फत (DBT Direct Benefit Transfer) हे पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 30 लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार एकूण 3737 कोटी रुपये पाठवणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government employees Single male parent child care leave Jitendra Singh