मुंबई, पुण्यावर केंद्राचे लक्ष; केंद्रीय सचिवांनी घेतला आढावा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 मे 2020

लॉकडाउनचे चार टप्पे होऊनही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने आता सर्वाधिक झळ बसलेल्या मुंबई, पुणे ठाण्यासह देशातील 13 जिल्ह्यांवर उपायांसाठी लक्ष केंद्रीत केले आहे.

नवी दिल्ली - लॉकडाउनचे चार टप्पे होऊनही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने आता सर्वाधिक झळ बसलेल्या मुंबई, पुणे ठाण्यासह देशातील 13 जिल्ह्यांवर उपायांसाठी लक्ष केंद्रीत केले आहे. रुग्णसंख्या आणि रुग्णांचा वावर लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर प्रतिबंधित क्षेत्र आखणीची आणि लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणीची सूचना केंद्राने या जिल्ह्यांना आज दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे, गुजरातमधील अहमदाबाद, राष्ट्रीय राजधानी दिल्ली, तेलंगाणातील हैदराबाद, पश्चिम बंगालमधील कोलकाता (हावडा), मध्य प्रदेशातील इंदूर, राजस्थानातील जयपूर, जोधपूर, तामिळनाडूतील चेन्नई, चेंगलपट्टू आणि थिरुवल्लुर या तेरा जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे आता कोरोना नियंत्रणाची रणनिती जिल्हापातळीवर नेण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. याच रणनितीचा भाग म्हणून केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी मुंबई, पुण्यासह देशभरातील 13 शहरांचे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. संबंधित राज्यांचे मुख्य सचिवही यात सहभागी झाले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्राच्या आतापर्यंतच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे स्थानिक पातळीवर काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची विचारणा केंद्राकडून झाली. त्यात रुग्णसंख्या वाढीचा वेग, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण, कोरोना चाचण्यांचेप्रमाण यासह रुग्णालयांमधील व्यवस्था, व्हेंटीलेटर, आरोग्य कर्मचाऱ्यांची स्थिती याबाबींचा समावेश होता. आता रुग्णसंख्या, रुग्णांचा संपर्क असलेल्या भागांच्या आधारे प्रतिबंधित क्षेत्राची आखणी केली जावी. यातून लॉकडाउनची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकेल, असा सल्लाही केंद्रातर्फे देण्यात आला. त्यानुसार रहिवासी कॉलन्या, मोहल्ला, वॉर्ड किंवा पोलिस स्थानकांचा परिसर, महापालिका क्षेत्र, शहरी भाग प्रतिबंधित क्षेत्र ठरविता येईल. उपाय योजनांसाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनात समन्वय राखण्याचाही सल्ला केंद्राने दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government focused on Mumbai & Pune because number of corona patients increases