esakal | सरकारचा ‘इथेनॉल’च्या दरवाढीचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

ethanol

इथेनॉलचा दर    जुना    नवा (रुपये/लिटर)
सी हेवी    ४३.३६    ४३.७५
बी हेवी    ५२.४३    ५४.२७
उसाच्या रस किंवा सिरपपासून तयार होणारे इथेनॉल - ५९.४८ रुपये लिटर

सरकारचा ‘इथेनॉल’च्या दरवाढीचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली -  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या आज झालेल्या बैठकीत इथेनॉलच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. पुढील वर्षात इथेनॉलचा वापर २६० कोटी लिटरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखरेच्या बरोबरीनेच उत्पन्नाचे एक नवे साधन, तसेच खनिज तेल आयातीपोटी लागणाऱ्या परकी चलनाची बचत व पर्यावरण अनुकूल इंधन असे तिहेरी फायदे या निर्णयापासून होतील, असा सरकारचा दावा आहे.

आजच्या निर्णयानुसार ‘सी हेवी इथेनॉल’च्या दरात ४३.३६ रुपये लिटरवरून ४३.७५ रुपये, ‘बी हेवी इथेनॉल’च्या दरात ५२.४३ रुपये लिटरवरून ५४.२७ रुपये लिटर आणि उसाच्या रसापासून किंवा सिरपपासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी ५९.४८ रुपये लिटर भाव निश्‍चित करण्यात आला आहे. याला जीएसटी लागू राहील. तेलउत्पादक कंपन्यांना इथेनॉल वाहतुकीचे दर रास्त व परवडणारे ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अतिरिक्त उत्पादनामुळे संकटग्रस्त साखर उद्योग व त्यावर अवलंबून ऊस उत्पादक शेतकरी या दोघांना मदत होण्याच्या दृष्टीने  सरकारने नुकतेच काही निर्णय केले होते. त्यामध्ये चाळीस लाख टनाचा राखीव साखरेच्या साठ्यासाठी १६७४ कोटी रुपयांची तसेच ६० लाख टन साखर निर्यातीसाठी ६२६८ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याच मालिकेत आज इथेनॉल दरवाढीचा निर्णय करण्यात आला, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले.

‘आयडीबीआय’ला ९,३०० कोटी
आयडीबीआय बॅंकेला ९,३०० कोटी रुपयांचा अर्थपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. या रकमेपैकी केंद्र सरकार ४,५५७ कोटी रुपयांचा वाटा उचलणार आहे, कारण या बॅंकेत केंद्राची ४९ टक्के भागीदारी आहे. या बॅंकेत ५१ टक्के भागीदारी असलेल्या आयुर्विमा महामंडळातर्फे त्या प्रमाणात म्हणजे ४,७४३ कोटी रुपयांचा पुरवठा केला जाणार आहे. यामुळे या बॅंकेला आर्थिक बळ मिळणार आहे. या बॅंकेने ‘एनपीए’चे प्रमाण ८  टक्‍क्‍यांपर्यंत कमी केल्याची माहितीही त्यांनी दिली.

इथेनॉलचा दर    जुना    नवा (रुपये/लिटर)
सी हेवी    ४३.३६    ४३.७५
बी हेवी    ५२.४३    ५४.२७
उसाच्या रस किंवा सिरपपासून तयार होणारे इथेनॉल - ५९.४८ रुपये लिटर

loading image
go to top