esakal | राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे १ कोटी डोस शिल्लक : केंद्र सरकार

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

पुढील तीन दिवसांत त्यांना ५७ लाख ७० हजार लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी (ता.२८) म्हटले आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे १ कोटी डोस शिल्लक : केंद्र सरकार
sakal_logo
By
वृत्तसंस्था

Fight with Corona : नवी दिल्ली : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरण मोहीम हाती घेतली. पण इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात लसीकरण मोहीम राबविणे ही सोपी गोष्ट नाही. अनेक राज्यांत आताच लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत. महाराष्ट्रातही लसीकरण थांबविण्यात आले आहे. लस उपलब्ध नसल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्या लोकांनी पहिला डोस घेतला आहे, ते दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

याची दखल घेत केंद्र सरकारने लसींच्या उपलब्धतेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे एक कोटीपेक्षा जास्त लसी उपलब्ध आहेत आणि पुढील तीन दिवसांत त्यांना ५७ लाख ७० हजार लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी (ता.२८) म्हटले आहे.

हेही वाचा: कोरोनाचा कहर सुरुच; देश लॉकडाऊनच्या वाटेवर

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना १५ कोटी ९५ लाख ९६ हजार १४० लसी दिल्या आहेत. आतापर्यंत १४ कोटी, ८९ लाख ७६ हजार २४८ लसी वापरल्या गेल्या असून राज्यांकडे १ कोटी ६ लाख १९ हजार ८९२ लसी शिल्लक आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात लसींचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे वृत्त काही माध्यमांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत प्रसिद्ध केलं आहे. ज्यामुळे राज्यात लसीकरण अभियानावर विपरीत परिणाम होत आहे.

महाराष्ट्राला २८ एप्रिल रोजी १ कोटी ५८ लाख ६२ हजार ४७० डोस देण्यात आले. यापैकी १ कोटी ५३ लाख ५६ हजार १५१ लसींचा वापर करण्यात आला. तर काही लसी (०.२२ टक्के) खराब झाल्या. त्यामुळे महाराष्ट्रकडे सध्या ५ लाख ६ हजार ३१९ लसी उपलब्ध आहेत. आणि पुढील तीन दिवसांत ५ लाख लसी पाठविण्यात येणार आहेत.

हेही वाचा: पायथॉन-5मुळे तेजसची मारक क्षमता वाढली

दुसरीकडे दिल्लीला ३६ लाख ९० हजार ७१० लसी पाठविण्यात आल्या. त्यापैकी ३२ लाख ४३ हजार ३०० वापरल्या गेल्या. काही खराब झाल्या. तरीही त्यांच्याकडे ४ लाख ४७ हजार ४१० लसी उपलब्ध आहेत. आणि आणखी १ लाख ५० हजार लसी देण्यात येणार आहेत. राजस्थानला आतापर्यंत १ कोटी ३६ लाख १२ हजार ३६० लसी देण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडे ३ लाख ९२ हजार २ लसी उपलब्ध आहेत आणि आणखी २ लाख लसी पुरविल्या जातील.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशला १ कोटी ३७ लाख ९६ हजार ७८० लसी उपलब्ध आहेत. खराब झालेल्या लसींसह १ कोटी २५ लाख ३ हजार ९४३ लसी वापरल्या गेल्या आहेत. त्यांच्याकडे १२ लाख ९२ हजार ८३७ लसी उपलब्ध असून आणखी ७ लाख पाठविण्यात येणार आहेत. पश्चिम बंगालला १ कोटी ९ लाख ८३ हजार ३४० लसी दिल्या होत्या. त्यांच्याकडे आता २ लाख ९२ हजार ८०८ लसी असून आणखी ४ लाख लसी देण्यात येणार आहेत.

हेही वाचा: कोव्हिशील्ड लसीचे काय आहेत Side effects?; संशोधनातून सत्य आलं समोर

कर्नाटक राज्याला ९४ लाख ४७ हजार ९०० लसी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९१ लाख १ हजार २१५ लसींचा वापर झाला. त्यांच्याकडे ३ लाख ४६ हजार ६८५ लसी उपलब्ध असून आणखी ४ लाख लसी पुरवल्या जातील. छत्तीसगडला ५९ लाख १६ हजार ५५० लसी दिल्या होत्या. त्यांच्याकडे आता ३ लाख ३८ हजार ९६३ लसी उपलब्ध असून आणि दोन लाख लसी पाठविण्यात येणार आहेत.

कोरोना महामारीला रोखण्यासाठी केंद्र सरकारने पंचसूत्री रणनीती आखली आहे. तपासणी, संपर्कात आलेल्यांचा शोध, उपचार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमांचे पालन आणि लसीकरण याद्वारे कोरोनाला रोखता येईल. सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.