esakal | जीएसटीचा दिलासा; कर संकलन एक लाख कोटींवर
sakal

बोलून बातमी शोधा

जीएसटीचा दिलासा; कर संकलन एक लाख कोटींवर

जीएसटीचा दिलासा; कर संकलन एक लाख कोटींवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) सप्टेंबर महिन्यात १ लाख १७ हजार १० कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी संकलनाने एक लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.महाराष्ट्रातील सप्टेंबर महिन्याच्या जीएसटी महसूल संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदा जुलै महिन्यात एक लाख १६ हजार ३९३ कोटी रुपये तर, ऑगस्ट महिन्यात एक लाख १२ हजार २० कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातील संकलित करामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी २० हजार ५७८ कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी २६ हजार ७६७ कोटी रुपये, आयजीएसटी ६० हजार ९११ कोटी रुपये यांचा समावेश आहे. सरकारने नियमित समझोता म्हणून आयजीएसटीमधून २८ हजार ८१२ कोटी रुपये सीजीएसटीला आणि २४ हजार १४० कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर सप्टेंबर महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारांना सीजीएसटीपोटी ४९ हजार ३९० कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी ५० हजार ९०७ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

गेल्या वर्षीच्या याच महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा सप्टेंबर २०२१ मध्ये २३ टक्के अधिक महसूल गोळा झाला आहे. या महिन्यात आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी ३० टक्के अधिक महसूल जमा झाला असून, देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा महसूल गेल्या वर्षी याच महिन्यात संकलित महसुलापेक्षा २० टक्के अधिक आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये संकलित ९१ हजार ९१६ कोटी रुपयांचा महसूल होता, तर यावर्षीचे महसूली संकलन गेल्या वर्षीपेक्षा ४ टक्क्यांना जास्त आहे.

विद्यमान वर्षातील दुसऱ्या तिमाहीत एकूण मासिक सरासरी जीएसटी संकलन १.१५ लाख कोटी रुपये झाले आहे आणि हे या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत संकलित झालेल्या १.१० लाख कोटी रुपयांच्या एकूण मासिक सरासरी संकलनाहून ५ टक्के अधिक आहे. अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे हे निदर्शक असल्याचा दावा अर्थमंत्रालयाने केला आहे.

कडक कारवाईचे यश

आर्थिक विकासासोबतच, कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई, विशेषतः बनावट बिले तयार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईने देखील जीएसटी महसूल संकलन वाढविण्यात योगदान दिले. आगामी महिन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीएसटी महसूल संकलन होण्याचा कल कायम राहील आणि या वर्षीच्या उर्वरित सहा महिन्यांमध्ये याहून अधिक जीएसटी महसूल संकलन होईल, अशी अपेक्षा अर्थ मंत्रालयाने व्यक्त केली.

महाराष्ट्रातील जीएसटी संकलन

एकूण वाढ : २२ टक्के

सप्टें. २०२० - १३ हजार ५४६

सप्टें. २०२१ - १६ हजार ५८४

loading image
go to top