Gujarat Assembly Election : गुजरातचे २५ वर्षांचे भवितव्य ठरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Election

Gujarat Assembly Election : गुजरातचे २५ वर्षांचे भवितव्य ठरणार

पालनपूर : ‘‘गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणूक ही आमदार किंवा सरकार निवडून देण्यासाठी नाही तर पुढील २५ वर्षांसाठी राज्याचे भवितव्य निश्चित करणारी आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

भाजप उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे आयोजित सभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि गुजरातच्या सरकारने राज्यात विकासाची खूप कामे केली आहेत. पण आता मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे. कोण आमदार बनणार किंवा कोणाचे सरकार सत्तेवर येणार, यासाठी ही निवडणूक नाही. पुढील २५ वर्षांसाठी गुजरातचे भवितव्य या निवडणुकीतून निश्‍चित होणार आहे.’’

गुजरातचे नाव विकसित देशांच्या गटात घेतले जावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे. एक मजबूत सरकार बनविण्यासाठी मला तुमचे समर्थन हवे आहे. असे आवाहन मोदी यांनी मतदारांना केले. तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगण्याची गरज नाही. कारण मी येथेच लहानाचा मोठा झालो असल्याने येथील स्थिती मला चांगलीच माहीत आहे. बनासकांठा जिल्‍ह्यातील सर्व जागांवर भाजपला विजयी करण्याचे आवाहन मी तुम्हा सर्वांना करीत आहे, असेही ते म्हणाले.

विकास कामांवर लक्ष केंद्रित

गुजरात सरकारने बनासकांठा आणि आसपासच्या परिसराचा संपूर्ण विकासासाठी पर्यटन, पर्यावरण, पाणी आणि पशुपालन आणि पोषणाशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केले आहे. पाणी आणि विजेचे संकट दूर करण्यात आम्ही खूप कमी वेळेत यश मिळविले आहे. काही वर्षांपूर्वी स्थिती एवढी खराब होती, असे २० ते २५ वर्षे वयोगटातील युवकांना कल्पनाही नसेल.

‘विजेतून कमाईची वेळ’

मोडासा : ‘‘मोफत वीज देण्याऐवजी विजेपासून उत्पन्न मिळविण्‍याची वेळ आली आहे,’’ असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला आज मारला. या दोन्ही पक्षांनी गुजरातच्या निवडणुकीत मोफत वीज पुरविण्याचे आश्‍वासन दिले आहे.

अरवली जिल्ह्यातील मोडासा येथील प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले विजेतून पैसे कसे कमविता येतील, याची कला फक्त मला माहीत आहे. मोफत वीज मिळविण्याऐवजी गुजरातमधील नागरिक छतावरील सौर यंत्रणेतून निर्माण होणाऱ्या जादा विजेतून उत्पन्न मिळवीत असल्याचे आम्हाला पाहायचे आहे. सौर यंत्रणेतून निर्माण झालेली जादा वीज विकून तुम्ही पैसे कमवू शकतात, असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण मोढेरा गावात छतावरील सौरऊर्जा यंत्रणा उभारली आहे, हे तुम्ही पाहायलाच हवे. ‘फोडा आणि राज्य करा’या सूत्रावर काँग्रेसचा विश्‍वास असून सत्तेवर कसे राहता येईल, याकडेच त्यांचे लक्ष असते, अशी टीका त्यांनी केली.