मुख्यमंत्रिपद हुकल्यानं नितिन पटेल नाराज; म्हणाले, 'मी काही एकटाच...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्रिपद हुकल्यानं नितिन पटेल नाराज; म्हणाले, 'मी काही एकटाच...'

नितिन पटेल म्हणाले की, मी या चर्चांमुळे त्रासलेलो नाही. भुपेंद्रभाई आपलेच आहेत. त्यांनी मला एक आमदार म्हणून त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी बोलावलं होतं.

मुख्यमंत्रिपद हुकल्यानं नितिन पटेल नाराज; म्हणाले, 'मी काही एकटाच...'

गुजरातमध्ये विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर भुपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. मात्र, यानंतर काही तासांच्या आतच उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, माझ्या आय़ुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत. मी लोकांच्या मनात राहतो आणि तिथून मला कोणी काढू शकत नाही.

रविवारी मेहसाणामधील एका रस्त्याच्या आणि ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनासाठी ते गेले होते. त्यावेळी नितिन पटेल यांनी मनातली सल बोलून दाखवली. मी एकटाच नाही ज्यांची बस चुकली, तर माझ्यासारखे आणखी काही आहेत असं म्हणत त्यांनी नाराजांची संख्या अजून असल्याचे संकेत दिले आहेत.

विजय रुपाणी यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर नितिन पटेल मुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, भाजपच्या आमदारांच्या बैठकीत भुपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या निर्णयाने नितिन पटेल नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र नितिन पटेल यांनी आपण नाराज नसल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा: भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर, माजी मंत्री पाटील यांचा खुलासा

भुपेंद्र पटेल हे विजय रुपाणी यांच्यासोबत सायंकाळी सरकार स्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री नितिन पटेल तिथे नव्हते. कार्यक्रमात बोलताना नितिन पटेल म्हणाले की, बस चुकलेला मी एकटाच नाही. त्यामुळे त्या नजरेने तुम्ही याकडे पाहू नका. पक्षाकडून निर्णय़ घेतले जातात. लोक मात्र तर्क वितर्क लढवतात. मी आमदारांच्या बैठकीनंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाणार असल्याची कल्पना दिली. जर हे महत्त्वाचं नसतं तर मी इथं आलो नसतो पण हे गरजेचं होतं. यासाठी पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिली असंही नितिन पटेल यांनी सांगितलं.

भुपेंद्र पटेल यांच्याबद्दल बोलताना नितिन पटेल म्हणाले की, मी या चर्चांमुळे त्रासलेलो नाही. भुपेंद्रभाई आपलेच आहेत. त्यांनी मला एक आमदार म्हणून त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी बोलावलं होतं. मला फरक नाही पडत की लोक काय बोलतात, काय विचार करतात. पण मला धोका नाही. कारण माझं अस्तित्व तुमच्यामुळे आहे.

सध्या नितिन पटेल हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. त्याबाबत अद्याप भाजपने स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. भुपेंद्र पटेल आणि नितिन पटेल हे दोघेही गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या पाटीदार समाजातील नेते आहेत.

Web Title: Gujarat Cm Bhupendra Patel Deputy Cm Nitin Patel Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Gujarat