मंत्र्यांच्या मुलाला रोखणाऱ्या कॉन्स्टेबल सुनितावर 3 आरोप, मागे लागलाय चौकशीचा ससेमिरा

सूरज यादव
शुक्रवार, 17 जुलै 2020

सुनिताला सोशल मीडियावरून समर्थन दिलं जात असलं तरी तिच्यावर तीन आरोप करण्यात आले आहेत. त्याची चौकशी केली जात आहे.

अहमदाबाद - गुजरातमधील महिला पोलिस कॉन्स्टेबल सुनिता यादवने मंत्र्यांच्या मुलाला अडवल्याच्या व्हिडिओनंतर बराच वाद झाला. या प्रकरणानंतर सुनिता यादवने राजीनामाही दिला होता. मात्र तिचा राजीनामा न स्वीकारता बदली करण्यात आली. यानंतरही अद्याप तिच्या अडचणी सुरु असून तीन तीन चौकश्यांचा ससेमिरा लागला आहे. सध्या सोशल मीडियावरून सुनिताचे समर्थन केलं जात आहे. सुनिताच्या राजीनाम्याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. पोलिस आयुक्तांनी सांगितलं की, सुनिताची चौकशी अद्याप सुरू आहे.

सुनिताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरणही तापलं होतं. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत नसल्याच्या कारणावरून सुनिताने मंत्र्यांच्या मुलासह मित्रांना अडवलं होतं. त्यानंतर मंत्रीपुत्राने तिला वर्दी उतरवण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी चौकशी सुरु असल्यानं तांत्रिकदृष्ट्या सुनिता राजीनामा देऊ शकत नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचा - लंडनमध्ये सचिन पायलट यांची काश्मिरी कन्येसोबत फुलली प्रेमकहाणी

दरम्यान, सुनिताला सोशल मीडियावरून समर्थन दिलं जात असलं तरी तिच्यावर तीन आरोप करण्यात आले आहेत. त्याची चौकशी केली जात आहे. सुनितावर असा आरोप करण्यात आला आहे की, ती लोकांना रस्त्यावरच बैठका करायला लावत होती. याविरुद्ध तिची चौकशी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे तिच्यावर असा आरोप ठेवण्यात आला की, 9 जुलैपासून ती ड्युटीवरून गायब आहे. याशिवाय मंत्र्याच्या मुलाला अडवलेल्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. अशा तीन प्रकरणात तिची चौकशी होत आहे. 

हे वाचा - नोकरी सोडून उभी केली 1.70 लाख करोड रुपयांची कंपनी; आता मुलीसाठी सोडलं अध्यक्षपद

सोशल मीडियावरून सुनिताला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला जात आहे. तिच्याविरोधात केली जाणारी कारवाई चुकीची असून व्यवस्थेला दोष दिला जात आहे. गुजरात सरकारमधील मंत्री कुमार कनानी यांच्या मुलाची गाडी सुनिताने अडवली होती. मित्रांसोबत फिरताना त्यानं लॉकडाऊनचं उल्लंघन केलं होतं. त्याला ताब्यातही घेण्यात आलं होतं. मात्र नंतर जामिनावर सुटकाही झाली होती. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सुनिताने आरोप केला होता की, रात्रीच्यावेळी लॉकडाऊन आणि कर्फ्यु असताना तिने काही लोकांना अडवलं. तेव्हा त्यांनी तिची वर्दी उतरवण्याची धमकी दिली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. त्यावेळी मित्रांनी प्रकाश कनानीला बोलावलं होतं. तेव्हा वडिलांच्या गाडीतून आलेल्या प्रकाशने सुनिताशी वाद घातला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat constable sunita yadav inquiry after action against minister son