esakal | लंडनमध्ये सचिन पायलट यांची काश्मिरी कन्येसोबत फुलली प्रेमकहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot with sara love story

सचिन पायलट लंडनला एमबीएचं शिक्षण घेण्यासाठी गेले असताना तिथं भारतातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या मुलीच्या प्रेमात पडले. 

लंडनमध्ये सचिन पायलट यांची काश्मिरी कन्येसोबत फुलली प्रेमकहाणी

sakal_logo
By
सूरज यादव

जयपूर - राजस्थानमध्ये बंडखोरी करून काँग्रेसला आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची सध्या देशभर चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिसीनंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजकारणात कमी वयात अनेक पदं भूषवणाऱ्या पायलट यांची राजकीय कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यांचे खासगी आयुष्यही तितक्याच चढ उतारांनी भरलेलं आहे. त्यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशीच आहे. 

सचिन पायलट यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात लंडनमधून झाली. एका काश्मिरी कन्येच्या प्रेमात पडलेल्या सचिन पायलट यांच्या लव्हस्टोरीत धर्माचा मोठा अडथळा होता. त्यानंतर मुलीच्या वडिलांचाही याला विरोध होता. लंडनमध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी सचिन पायलट गेले असताना पेनसिल्वेनिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची भेट सारा हिच्याशी झाली. सारा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आणि ओमर अब्दुल्ला यांची बहीण आहे.

हे वाचा - सचिन पायलट यांच्या बंडखोरीला आहे 'वारसा'; वडिलांनीही उचलला होता बंडाचा झेंडा

सचिन आणि सारा काही दिवसांच्या भेटीनंतर एकमेकांना आवडायला लागले आणि प्रेमात पडले. एमबीए पूर्ण झाल्यावर सचिन पायलट भारतात परतले. मात्र सारा शिक्षणासाठी लंडनमध्येच थांबली. दोघे दोन देशात असतानाही त्यांच्यातलं प्रेम कमी झालं नाही. तेव्हा ई मेल आणि फोनवरून दोघे नेहमी बोलत होते. शेवटी सचिन आणि सारा यांनी त्यांच्या घरी लग्नाबाबत सांगायचं ठरवलं.

लग्नाबाबत सर्वात मोठी अडचण होती ती दोघांच्या धर्माची. सचिन हिंदू तर सारा मुस्लीम यामुळे लग्नाच्या बोलणीला सुरुवात होण्याआधीच दोन्ही घरच्या लोकांनी याला विरोध केला. मात्र चित्रपटातील लव्ह स्टोरी सारकाच यांच्याही लव्हस्टोरीचा शेवट गोड झाला. यासाठी सचिन आणि सारा यांना मात्र बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या. 

हे वाचा - राजस्थानच्या रस्त्यावर जादू दाखवणाऱ्या गेहलोतांनी सत्तासंघर्षातही दाखवली जादू

साराचे वडील फारुख अब्दुल्ला यांनी लग्नासाठी स्पष्ट नकार दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की सचिनसोबत त्यांचे लग्न कधीच होणार नाही. साराने तिच्या वडिलांचे मन वळवण्यासाठी बराच प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. तेव्हा सचिन आणि सारा यांनी कोणाचेही न ऐकता जानेवारी 2004 मध्ये लग्न केलं. या लग्नात साराच्या घरचे कोणीही उपस्थित नव्हतं. सचिनच्या कुटुंबियांनी मात्र दोघांनाही आशीर्वाद दिले. त्यानंतर काही काळाने फारुख अब्दुल्ला यांनीही दोघांच्या नात्याला स्वीकारलं. 

सचिन पायलट यांनी आज राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुसऱ्या बाजुला सारा सामाजिक कामात कार्यरत असतात. सचिन आणि सारा यांना दोन मुलंही आहेत. सचिन पायलट कधीच राजकारणात येणार नव्हते. मात्र वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात पाऊल टाकले.