Gujarat Morbi Bridge : दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा; काँग्रेसची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Morbi Bridge collapse

Gujarat Morbi Bridge : दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा; काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली : मोरबी येथील पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दुर्लक्षामुळे आणि चुकीच्या व्यवस्थापनामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना देखील राज्य सरकारने वैद्यकीय आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, ‘‘ पाच दिवसांपूर्वी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला हा पूल नेमका कशामुळे कोसळला त्याचे कारण पुढे यायला हवे.

एवढ्या मोठ्या संख्येने तिथे लोकांना जाण्याची परवानगी का देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून याची चौकशी होणे गरजेचे आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना सरकारने वैद्यकीय मदत द्यावी. आमचे नेते घटनास्थळी दाखल झाले आहेत, राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत देखील तेथे पोचतील.

आम्हाला जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी आम्ही करू. या अशा संकटकाळी आम्हाला कोणावरही आरोप करायचे नाहीत. चौकशी अहवाल समोर आल्यानंतरच याबाबत काहीतरी बोलले जाऊ शकते. या दुर्घटनेची माहिती मिळताच आपण स्थानिक काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधत त्यांच्याकडून माहिती घेतली होती.’’ काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

खा. कुंदरियांचे कुटुंबीय मृत्युमुखी

भाजपचे राजकोटचे खासदार मोहनभाई कुंदरिया यांच्या कुटुंबातील तब्बल बाराजणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला असून त्यामध्ये त्यांच्या बहिणीच्या मोठ्या दिराच्या चार मुली, तीन जावई आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. ही अत्यंत दुःखद दुर्घटना असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे कुंदरिया यांनी नमूद केले. माझ्या डोळ्यासमोर शंभरपेक्षाही अधिक मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले होते, त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढू शकते असे कुंदरिया यांनी नमूद केले.

चहा विक्रेत्याचे दुःख

मोरबीत मच्छू नदीच्या काठावरील स्थानिक चहा विक्रेत्याने सांगितले की, ‘‘ ही दुर्घटना पाहिल्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही, मी अनेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्राण वाचवू शकलो नाही. एक गर्भवती महिला माझ्यासमोर मरण पावत असताना मी तिला मदत करू शकलो नाही. ही दुर्घटना मी कधीच विसरू शकत नाही. हा पूल तुटल्यानंतर देखील अनेकजण रॉडला केबलला लटकले होते पण नंतर तेही पाण्यात पडले.’’

तरुण पूल हलवीत होते

या दुर्घटनेतून बचावलेल्या विजयने म्हटले आहे की, ‘‘ मी कुटुंबीयांसोबत या पुलावर पोचले तेव्हा काही तरुण हे जाणीवपूर्वक तो पूल जोरजोराने हलवीत होते. यामुळे पुलावर येणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. अशा स्थितीमध्ये पुलावर थांबणे धोकादायक ठरू शकते असे वाटल्याने आपण स्वतःच्या कुटुंबीयांचा विचार न करता पुलावरून माघारी परतलो. याबाबत आपण देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली होती पण त्यांनी दुर्लक्ष केले.’’

पुलाची क्षमता शंभर लोकांची

या पुलाची क्षमता केवळ शंभर लोकांची होती, त्यावर जाण्यासाठी देखील पंधरा रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. दिवाळीच्या काळात या भागात मोठ्या संख्येने लोक येतात. केवळ कमाईच्या उद्देशाने या पुलाची कोणतीही तपासणी न करताच तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. ज्यावेळी हा पूल कोसळला तेव्हा त्याच्यावर चारशे ते पाचशे लोक होते. हे ओझे सहन न झाल्यानेच तो कोसळला असावा असे प्रत्यक्षदर्शींचे मत आहे.

टॅग्स :CongressGujaratBridge